
इराण आणि अमेरिकेतील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाल्याने आखातात सध्या तणावाचे वातावरण आहे. या संघर्षामुळे जगातील तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. शुक्रवारी आशियाई बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत 1 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूड 84 सेंट्स म्हणजेच 1.02 टक्क्यांनी वाढून 83.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तर दुसरीकडे, अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडच्या किमतीतही 69 सेंट्सची म्हणजे 0.89 टक्के वाढ झाली असून ते 77.98 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. गुरुवारी तेल बाजारात 3 डॉलरची मोठी वाढ झाली होती आणि शुक्रवारीही ही तेजी कायम राहिलेली पाहायला मिळाली. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
कच्च्या तेलाच्या दरात आलेल्या या तेजीमागे होर्मुझच्या समुद्रधुनीतील वाढता तणाव हे मुख्य कारण मानले जात आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील एकूण कच्च्या तेलाच्या आणि एलएनजी जहाजांच्या वाहतुकीपैकी तब्बल 20 टक्के वाहतूक याच मार्गाने होत होती.
इराणच्या संसदेत एक प्राथमिक विधेयक विचारधीन आहे. त्यानुसार अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्याशी संबंधित शत्रू जहाजांना या समुद्रातून प्रवास करण्यास बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजांवर त्यांच्या एकूण मालाच्या मूल्याच्या 20 टक्क्यांपर्यंत मोठा दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, इराणने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर 5 ते 7 टक्के प्रवास शुल्क आकारण्याची मागणी केली आहे, तर ओमान 3 टक्के शुल्कावर चर्चा करत आहे. मात्र, अमेरिकेने या मार्गावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
युद्ध लवकर संपण्याचा दावा
एकीकडे आखातात तणाव वाढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरच संपुष्टात येईल अशी आशा व्यक्त केली आहे. मला वाटते हे युद्ध खूप लवकर संपेल. इराण आता फार काळ संघर्ष सुरू ठेवू शकेल अशी परिस्थिती नाही, असे व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधून बोलताना ट्रम्प म्हणाले.


























































