
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वेच्या महिला मुख्य तिकीट तपासनीस वृषाली सावंत-जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका जखमी प्रवासी महिलेचे प्राण वाचले. वृषाली सावंत देवदूत ठरल्यामुळे जखमी महिलेला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या धाडसी कृतीचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
बुधवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर वृषाली सावंत या नियमित कर्तव्यावर होत्या. त्याचवेळी पूजा जड्यार (२३) ही महिला प्रवासी रेल्वेतून उतरत असताना गर्दीमुळे प्लॅटफॉर्मवर पडली. घटनेची माहिती मिळताच वृषाली सावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमी महिलेकडे धाव घेतली. जखमी महिलेची प्रकृती पाहून वेळ दवडणे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात येताच त्यांनी हमालाची प्रतीक्षा न करता महिलेला उचलून घेत थेट स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णाल यात उपचारासाठी दाखल केले.
तातडीच्या उपचारामुळे जीवदान
वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे महिलेवर त्वरित उपचार करता आले आणि त्यांचा जीव वाचला. संकटाच्या क्षणी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे टीसी वृषाली सावंत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




























































