
ग्रामपंचायतीची ग्रामसभा केवळ ठरावांची औपचारिकता न राहता ग्रामस्थांच्या थेट सवालांनी गाजली. शिक्षण, बेरोजगारी, गाळे, अंगणवाडी, दलितवस्ती निधी आणि गावातील विकासकामांवर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने ग्रामसभेत वातावरण तापले होते.
गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रश्न ऐरणीवर आणत सेवानिवृत्त अधिकारी कैलास येळमामे यांनी ग्रामपंचायतीने व्यावसायिक गाळे उभारून स्थानिक युवकांना व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी ठोस मागणी केली. गावातील खासगी गाळाभाडे चारपट असल्याने स्थानिक रोजगाराची गरज अधिक तीव्र झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱया छोटय़ा व्यावसायिकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. गाळे उभारल्यास युवकांना रोजगार मिळेल, वाहतूक सुरळीत राहील आणि ग्रामपंचायतीलाही कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असा मुद्दा त्यांनी मांडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मुतडक यांनी काही प्रश्न मांडत या प्रस्तावाला पाठिंबा देत बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले.
आमच्या तक्रारी चुकीच्या आहेत काय; महिलांचा सवाल
ग्रामसभेत शिक्षणाचाही मुद्दा तीव्रतेने उपस्थित झाला. शासनाची शाळा विनामूल्य असताना खासगी शाळा या जागेत भरवत तीन साडेतीन हजार रुपये फी का घेतली जाते, पालकांना अधिकृत पावती दिली जात नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. पूर्वी दत्त मंदिरात भरणारी शाळा आता जिल्हा परिषद शाळेत भरवली जात असल्याचे सांगत अंगणवाडीतील मुलांना वळविल्याने अंगणवाडी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही करण्यात आला. आमच्या तक्रारी चुकीच्या असतील तर दाखवून द्या, अन्यथा आम्ही थेट आमदारांची भेट घेऊ, असा इशाराच महिलांनी ग्रामसभेत दिला.
तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी मिळणारा दलित वस्ती, तांडा, पेसा आदी निधी संबंधित वस्त्यांमध्येच खर्च, निकृष्ट दर्जाची कामे आदींबाबत प्रश्नांचा भडिमार करत काही निर्णय घेण्यात आले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या सुमारे 57 लाख रुपयांच्या योजनेसाठी ग्रामस्थांनी पाच गुंठे जागा देण्यासही सहमती दर्शविली. यावेळी माजी सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, किरण माळवे, शरद बनसोडे, कैलास येलमामे, विजय हेकरे, पूजा घाटकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष मुतडक, सोमनाथ मुतडक, दीपक देशमुख, अशोक मुतडक, संजय भडांगे, बाळासाहेब लहामगे, रामदास पवार, सचिन मुतडक यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विविध विषयांवर मते मांडली.




























































