
शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत ब्रेकफास्ट पे चर्चा करणार आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी पक्षांतर आणि राजकीय फुटीरतेला थेट अशा पद्धतीने प्रतिष्ठा देऊ नये. 50-50 कोटींना विकलेल्यांसोबत पंतप्रधान गुलछबुगिरी करणार आहेत. हे या देशाच्या नेतृत्वाचे झालेले अध:पतन आणि घसरगुंडी आहे, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली. ते ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, बेईमानी करून किंवा घटनाबाह्य पद्धतीने पक्षांतर करून, कायद्याचा भंग करून जे लोक एका चिन्हावर निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात त्यांच्या बरोबर देशाचे पंतप्रधान आज ढोकळा, फाफडा आणि शेवगाठी खाणार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी पक्षांतर आणि राजकीय फुटीरतेला निदान थेट अशा पद्धतीने प्रतिष्ठा देऊ नये ही भूमिका स्वीकारायला पाहिजे. त्यामुळे जशी राजा तशी प्रजा निर्माण होते. 50-50 कोटी रुपयांना माणसं विकत घेतली आणि त्यांच्याबरोबर तुम्ही गुलछबुगिरी करणार आहात. हे देशाच्या नेतृत्वाचे झालेले अध:पतन आणि घसरगुंडी आहे.
तू किती फोडले, मी किती फोडले आणि अजून किती फोडणार या पलीकडे दोघांकडे बुद्ध्यांक आहे असे वाटत नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर केली. तसेच हा हा करून हसणार आणि आता महाराष्ट्रामध्ये अदानीला कुठल्या प्रॉपर्टी द्यायच्या, उद्योगपतींना अजून काही विकता येईल का याची चर्चा करणार. आता बेस्टही विकायला काढली असून ती गौतम अदानीला देण्यासंदर्भात एक भूमिका तयार होत आहे. आता काय शिल्लक आहे का विकण्यासाठी याच्यावर दोघांमध्ये चर्चा होईल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांची फोडाफोडी सुरू आहे. आकडा मिळवण्यासाठी ही फोडाफोडी सुरू असून सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. जनतेने तुम्हाला 240 खासदार निवडून दिलेले आहेत, त्याचे 300 कसे झाले याचा हिशेब द्यायला पाहिजे. हे वरचे खासदार तुमच्याकडे कुठून आले? विकत घेतले, फोडले, चोरले असे तुम्ही सांगा…. आता अजून काही पक्ष फोडणअयासाठी त्यांनी माणसं कामाला लावले आहेत. आकडा झाल्यावर डिलिमिटेशन बील आणण्याचे चालले आहे. देशाच्या राजकीय प्रतिष्ठेची घसरगुंडी गेल्या दहा-बारा वर्षांत जेवढी झाली, तेवढी याआधी कधीच झाली नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप स्वत: मोदींनी केले, ते सगळेच आज त्यांचे हस्त म्हणून काम करताहेत. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कॅमेऱ्यासमोर लाच स्वीकारली. सुवेंदू अधिकारी कसा पैसे स्वीकारतोय याच्या नकला करून मोदींनी प्रचाराच भाषणं केली. हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावरही मोदींनी आरोप केले होते. अजित पवारांवरही मोदींनी आरोप केले होते. हे सगळे तुमचे सहकारी कसे होऊ शकतात? असा सवालही संजय राऊत यांनी केला.



























































