
थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी एका विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात शिक्षकासह दोघांचा मृत्यू झाला. शाळेत गोळीबार केल्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नॉनथाबुरी प्रांताचे पोलीस कमांडर लेफ्टनंट कर्नल देचरपी कोंगडी यांनी घटनेला दुजोरा दिला आहे.
बँकॉकच्या उत्तरेकडील नॉनथाबुरी प्रांतातील बँग क्रुआई जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली. गोळीबारात शिक्षकासह किमान दोन जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गोळीबार करणारा विद्यार्थी नववीचा विद्यार्थी होता, असे कोंगडी यांनी सांगितले. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत.




























































