जो राजा जनतेला घाबरला, त्याची जाण्याची वेळ आलीय! अरविंद केजरीवाल यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सोशल मीडियावरील संवेदनशील पोस्ट किंवा व्हिडीओ यांच्यासंदर्भात एक निर्णय घेतला आहे. ‘संवेदनशील’ ऑनलाइन मजकूर हटवण्याची मर्यादा 36 तासांवरून 3 तास केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती तंत्रज्ञान (IT) नियम, 2021 मध्ये केलेल्या संशोधनांच्या आधारे ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या नव्या नियमांवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे. देशातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढी जनता पेटून उठेल, असा इशारा त्यांनी दिला.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने काल एक नवीन कायदा आणला आहे. आता मोदी सरकार इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर कोणतेही माध्यमांवरील एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट डिलीट करण्यास सांगेल, तेव्हा त्या प्लॅटफॉर्मला तो मजकूर अवघ्या 3 तासांच्या आत काढावा लागेल. हा नवीन कायदा आणला आहे. म्हणजे जर तुम्ही मोदींच्या, सरकारच्या किंवा पेपरफुटी विरोधात काहीही बोललात तर 3 तासातच तुमचा मजकूर सोशल मीडियावरून हटवला जाईल. पण जर या सरकारने मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली किंवा गुंडगिरी केली तर सरकार ते डिलीट करणार नाही, असा खोचक टोला केजरीवाल यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, मोदींना या देशातील लोकांची, युवकांची, तरुणींची भीती वाटू लागली आहे, म्हणून ते असे करतायत. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर सरकार आणखीनच घाबरले आहे. पण या भीतीवर लोकांचे आवाज दाबणे हा उपाय नाही. गेल्या 10 वर्षात मोदींनी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आणि जंतरमंतरवर लोकांच्या रागाचा उद्रेक झाला. आता मोदींनी चांगली कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, जर तुम्ही जनतेचा आवजच दाबण्याचा प्रयत्न केला तर जनता शांत बसणार नाही. जो राजा जनतेला घाबरतो त्याची जाण्याची वेळ जवळ येते, असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला.