
शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेल्या जनावरांची चोरी करून त्यांची कत्तल करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत परभणी जिल्ह्यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, हरियाणातील ६ फरार गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून मांस विक्रीतून मिळालेली २४ लाख ६८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या एकाच कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील २४ आणि शेजारील जिल्ह्यांतील १७ असे तब्बल ४१ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जनावरे चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष तपासाचे आदेश दिले होते. ६ ऑगस्ट रोजी किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा येथे आरोपी व्यवहारासाठी जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपींनी पिकअप वाहनातून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून अतिक सुलतान कुरेशी (गंगाखेड), मुजाहिद बाबू खाटीक (परभणी) आणि साजू गफार कुरेशी (पालम) या तिघांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींनी लातूरसह बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतून बैल, गायी, म्हशी व वासरे चोरी करून त्यांची कत्तल केल्याची कबुली दिली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, जळकोट, उदगीर, चाकूर, अहमदपूर, औसा यांसह विविध पोलीस ठाण्यांमधील २४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींकडून जप्त केलेली २४.६८ लाखांची रोकड ही मांस विक्रीतूनच मिळवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अमर केंद्रे, पोलीस अमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सुर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, विजय पाटील, सिध्देश्वर मदने, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, प्रेमदास राठोड, जमीर शेख, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, श्रीनिवास जांभळे हे या कारवाईत सहभागी झाले होते.





























































