Ratnagiri News – आंबा घाटात अवजड वाहतूक बंद, मालवाहतुकीवर मोठा परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. घाटातील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने आणि जमीन खचण्याचा धोका वाढल्यामुळे प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे दररोज सुमारे 900 मालवाहू ट्रकांचे चाक थांबले असून कोकणातील उद्योग, व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून दररोज सुमारे 500, तर कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 400 ट्रक आंबा घाटातून प्रवास करतात. मात्र घाटातील भीषण परिस्थितीमुळे ही सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागत आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढले असून इंधन, वेळ आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. या बंदीचा सर्वाधिक परिणाम बॉक्साईट, साखर आणि कोळसा यांसारख्या महत्त्वाच्या मालवाहतुकीवर झाला आहे. उद्योगांना आवश्यक कच्चा माल वेळेवर पोहोचत नसल्याने उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यापारी आणि वाहतूकदारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, प्रशासनाने घाटात दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली असल्याचा दावा केला असला तरी नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात आंबा घाटात अशीच परिस्थिती निर्माण होत असेल, तर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? असा संतप्त सवाल आता वाहनचालक आणि स्थानिकांकडून विचारला जात आहे.

सध्या हलक्या वाहनांना आणि अत्यावश्यक सेवांतील वाहनांना घाटातून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक आणि संरक्षक पत्रे बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता असल्याने कोकणातील व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवरील संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.

पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आंबा घाटातील वाढता धोका आणि रखडलेली कायमस्वरूपी उपाययोजना यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.