
देशभरात सक्तीच्या करण्यात आलेल्या ‘E20 पेट्रोल’ (इथेनॉल मिश्रण) धोरणाविरोधात जनता आक्रमक झाली आहे. E20 पेट्रोलमुळे अनेकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हाच इंधनाचा वापर टाळण्यासाठी उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील एका तरुण संशोधकाने वाहतूक क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. काफ्लिखान गावातील रहिवासी असलेल्या रवी टमटा याने ‘हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड’ या स्टार्टअपच्या माध्यमातून ‘हॅपिडा स्कायनेक्स’ (HAPIDA SKYNeX) ही इलेक्ट्रिक फ्लाइंग कार तयार केली आहे. इंधनामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या दिशेने हे एक मोठे यश मानले जात आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून ही कार तयार करण्यासाठी संशोधन सुरू होते. अखेर या फ्लाइंग कारची यशस्वी उड्डाण चाचणी पार पडली आहे. ही कार पूर्णपणे विजेवर चालणारी इलेक्ट्रिक कार असून त्यात कोणत्याही प्रकारच्या विमान इंधनाचा वापर केलेला नाही. यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होत असून हा एक अत्यंत पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहे. या प्रयोगामुळे भविष्यातील हवाई वाहतुकीचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तराखंडच्या स्टार्टअप आणि नवसंशोधनातून निर्माण झालेल्या या कारने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. तज्ज्ञांच्या मते, राज्याचा खडकाळ व डोंगराळ हिमालयीन भूभाग पाहता या प्रकारच्या प्रगत हवाई वाहतुकीचा वापर अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. यामुळे रस्ते दळणवळणाच्या मर्यादा सहज ओलांडता येऊ शकतात.
हे तंत्रज्ञान भविष्यात केवळ शहरी वाहतुकीपुरते मर्यादित न राहता दुर्गम पर्वतीय भागांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. भूस्खलन किंवा महापूर यांसारख्या आपत्तीच्या प्रसंगी मदतकार्य आणि आपत्कालीन सेवेसाठी, तसेच रस्ते पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम गावांशी संपर्क साधण्यासाठी हे वाहन वरदान ठरू शकते. तसेच यामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्रालाही नवीन दिशा आणि चालना मिळू शकते. रवी टमटा आणि त्यांच्या टीमने मिळवलेले हे यश हिंदुस्थानच्या प्रगत हवाई क्षेत्रातील वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि कौशल्याची साक्ष देणारे आहे.



























































