
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकमध्ये गुरुवारी मध्यरात्री पहिला बळी गेला. मुंबईच्या दिशेने जाणारी सुसाट फॉर्च्युनर कार टेम्पोवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तुषार भूमकर असे त्याचे नाव आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की, चारजण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर मिसिंग लिंकमधील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त फॉर्च्युनर गाडी पुण्याहून मुंबईकडे जात होती. मात्र ही कार भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडकली. अपघातात तुषार भूमकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर चार तरुण जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास ठप्प होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.
चालकासह पोलिसावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना बंदी असताना तिथे टेम्पो आलाच कसा? त्यामुळे टेम्पो चालक आणि मिसिंग लिंकवरून परवानगी देणारा पोलीस कर्मचारी या दोघांवरही सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करावा आणि मिसिंग लिंकच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर हाईट बॅरियर्स लावावेत, अशी मागणी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे.






























































