जो राजा जनतेला घाबरला त्याची जाण्याची वेळ आलीय, केजरीवाल यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जंतरमंतरवर जेन-झीचे आंदोलन झाल्यापासून नरेंद्र मोदी प्रचंड घाबरले आहेत. त्यांना तरुणांची, विद्यार्थ्यांची आणि मुलींचीही भीती वाटू लागली आहे, असा दावा करतानाच, ‘‘जो राजा जनतेला घाबरला, त्याची जाण्याची वेळ आलीय हे समजून जा,’’ असा इशारा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज दिला.

व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून केजरीवालांनी मोदी सरकावर हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘मोदी सरकारने एक नवा कायदा आणला आहे. त्यानुसार यापुढे सरकारने सोशल मीडियातील एखाद्या पोस्टला आक्षेप घेतला आणि ती काढण्याचा आदेश दिला तर तीन तासांच्या आत संबंधित पोस्ट डिलिट करावी लागणार आहे. याचाच अर्थ आता सरकारविरोधात, त्यांच्या इथेनॉल धोरणाविरोधात, पेपरफुटीविरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलता येणार नाही. कोणी काही बोलल्यास त्याची पोस्ट तीन तासांत डिलिट केली जाईल. इतरांच्या पोस्ट डिलिट केल्या जातील. पण भाजपच्या लोकांनी इतरांना शिवीगाळ केली, गुंडगिरी केली तरी त्यांना काही होणार नाही, असा हा मामला आहे. हे सगळे होण्याचे कारण मोदींना आता भीती वाटू लागली आहे.’’

…तर तुम्हाला भोगावे लागणारच!

मोदींच्या मनातील भीती लोकांचा आवाज दाबून जाणार नाही. त्यांच्या दडपशाहीविरोधातील राग जंतरमंतरवर दिसला. त्यामुळे आता चांगली कामे करणे हाच मार्ग त्यांच्यापुढे आहे. तसे झाले तर लोक त्यांचे काैतुक करतील. पण उलटी कामे करायची आणि लोकांचा आवाज दाबायचा असे झाले तर त्यांना भोगावे लागणारच. जितका जास्त आवाज दाबाल, तितका रोष वाढेल, असेही केजरीवाल यांनी सुनावले.