
जेन-झी तरुण आंदोलन करत असतील तर ते राष्ट्रविरोधी नाहीत. ते आपलेच लोक आहेत. ती आपली पुढची पिढी आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे, असे विधान करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या विधानावरून आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला. देशातील तरुण आंदोलकांना मोहन भागवत यांच्या कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
मोहन भागवत यांच्या याच विधानावरून आज संसद भवन परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रियांका गांधी यांनी उत्तर दिले. तरुणांना मोहन भागवत यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. गृहमंत्री घाबरले आहेत. त्यामुळेच ते दोन्ही सभागृहांत अनुपस्थित राहत आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. शहांनी सभागृहात येऊन दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ला आणि इतर कारवाईबद्दल भूमिका स्पष्ट करायला हवी. यात अडचण काय आहे? काही चुकीचे घडले असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.




























































