इन्शुरन्स कंपनीने नाकारलेला दीड लाखाचा दावा अखेर मंजूर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीने नाकारलेल्या एका विमा दावा प्रकरणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कंपनीने काही तासांत 1 लाख 42 हजारांचा विमा दावा मंजूर करून अंधेरी (पूर्व), येथील आराध्य हॉस्पिटलचे बिल काही तासांत मंजूर केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे पदाधिकारी रत्नेश खडपे यांच्यावर एका रुग्णालयात मुतखडय़ाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी विमा कंपनीकडे केलेला दावा इन्शुरन्स कंपनीने नाकारला. याची दखल घेत शिवसेना नेते, खासदार, ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या आदेशानुसार तसेच उपाध्यक्ष अशोक शेंडे व सरचिटणीस निखिल सावंत यांच्या सूचनेनुसार अंधेरी (पूर्व) विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षाचे विधानसभा संघटक व भारतीय कामगार सेना सहचिटणीस राम साळवी, विलेपार्ले विधानसभा कक्ष संघटक संतोष कदम, विवेक महाडिक, संजय गायके, देवेंद्र भोसले, सत्यवान पवार आणि विलास सुर्वे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कंपनीचे व्यवस्थापक हरीश हबीबकर, भूषण पिसे, शलाका सावंत आणि मंदार डावू उपस्थित होते. रत्नेश खडपे यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी कक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य संजय पावले, गणेश आढाव आदी उपस्थित होते.