
आर्थिक संकटाशी तोंड देत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची ७ तारीख पुन्हा चुकली आहे. सरकारने सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीचा निधी देण्याबाबत शुक्रवारी सायंकाळपर्यंत जीआरदेखील जारी केलेला नाही. राज्याच्या अर्थ विभागाने जूनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच एसटीच्या इतर खर्चाची जबाबदारी झटकत महामंडळालाच आर्थिक नियोजन करण्याचे सूचित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात पगाराला विलंब झाल्यामुळे राज्यभरातील ८६ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत गेल्या वर्षीपासून रखडपट्टी सुरू आहे. गेल्या वर्षी कामगार संघटनांनी आवाज उठवला होता. त्यावर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेलाच देऊ, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. मात्र जुलैच्या पगारासाठीची ७ ऑगस्टची डेडलाईन चुकल्यामुळे कर्मचारी चिंतेत आहे. पुढचे दोन दिवस (शनिवार आणि रविवार) बँकांच्या सुट्टीचे असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दर महिन्याला पुनः पुन्हा या गोष्टी घडू नयेत. एसटी कामगारांचे वेतन थेट शासनातर्फे कोषागारातून व्हावे यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा विलीनीकरणाची मागणी केली आहे, असे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.

























































