
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे एक थरारक घटना घडली. चंदरकोट येथील सुरक्षा तपासणी नाक्यावर थांबण्याचा इशारा करूनही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने पुढे आली. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी इशारा म्हणून तीन गोळ्या झाडल्या. मात्र, त्यानंतरही वाहनातील संशयितांनी स्कॉर्पिओसह घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिस, विशेष कृती गट, सीआरपीएफ आणि लष्कराच्या पथकांनी संयुक्तपणे मोठी शोधमोहीम सुरू केली. अखेर दलवासजवळ हीच स्कॉर्पिओ बेवारस अवस्थेत आढळून आली. वाहनातील मागील सीट काढण्यात आल्याचे तसेच आत शेणाचे अवशेष आढळल्याने या वाहनाचा वापर राष्ट्रीय महामार्गावर अवैध पशुधन तस्करीसाठी होत होता का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, शुक्रवारी पहाटे सुमारे 4 वाजता JK02AK-1743 क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होती. चंदरकोट सुरक्षा चौकीजवळ पोलिसांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन थांबवण्याऐवजी त्याचा वेग वाढवला. वाहन थेट तपासणी नाक्याच्या दिशेने वेगाने येत असल्याने तेथे तैनात कर्मचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच कॉन्स्टेबल रसाल चंद यांनी आपल्या सर्व्हिस रायफलमधून तीन गोळ्या हवेत इशारा म्हणून झाडल्या. मात्र, गोळीबारानंतरही चालकाने वाहन थांबवले नाही. चालक आणि त्याच्यासोबत असलेले इतर संशयित स्कॉर्पिओसह तेथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच चंदरकोट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर रामबन पोलिसांसह विशेष कृती गट, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दलवासजवळ एक स्कॉर्पिओ बेवारस अवस्थेत आढळली. तपास केल्यानंतर हीच गाडी चंदरकोट सुरक्षा चौकीवरून निसटलेली असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची तपासणी केल्यानंतर पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले. वाहनातील मागील सीट काढण्यात आल्या होत्या. त्याशिवाय वाहनाच्या आतील भागात शेणाचे अवशेष आढळले.
वाहनावर गोळ्यांच्या तीन खुणाही आढळल्या. चंदरकोट तपासणी नाक्यावर वाहन न थांबवल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या खुणा निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फॉरेन्सिक तपासासाठी जिल्हा फॉरेन्सिक मोबाईल युनिटला घटनास्थळी बोलावण्यात आले. वाहनातून विविध नमुने आणि पुरावे गोळा करण्यात आले असून, त्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी उधमपूर जिल्ह्यातील रहिवासी अल्ताफ मोहम्मद याला अटक केली आहे. मात्र, वाहनातील इतर संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांकडून उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू आहे.





























































