
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अजिंक्य रहाणे करणार तरी काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. युरोपियन टी-२० प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी ‘अॅमस्टरडॅम फ्लेम्स’ने अजिंक्य रहाणे याला आपला ‘आयकॉन खेळाडू’ (प्रमुख खेळाडू) म्हणून करारबद्ध केल्याची घोषणा आज केली.
युरोपियन क्रिकेट विकासाच्या एका रोमांचक आणि नवीन टप्प्यावर आहे. त्याचवेळी आपले नेतृत्वगुण, सातत्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांसाठी ओळखला जाणारा रहाणे या लीगमध्ये दाखल झाला आहे. संघाला जागतिक दर्जाचा ब्रँड बनवण्यासाठी या वेळी अजिंक्यची मदत होऊ शकते, असे म्हटले जात आहे. १९० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केलेल्या रहाणेने आपल्या संयमी नेतृत्वामुळे, तांत्रिक कौशल्यामुळे आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेमुळे सहकारी खेळाडू, प्रतिस्पर्धी आणि चाहते या सर्वांचा आदर संपादन केला आहे.
‘अॅमस्टरडॅम फ्लेम्स’चे सहसंस्थापक स्टीव्ह वॉ यांनी रहाणेचे क्लबमध्ये स्वागत केले. ते म्हणाले, “अजिंक्य रहाणेमध्ये एका व्यावसायिक क्रिकेटपटूकडून अपेक्षित असलेले कौशल्य, जिद्द, नम्रता आणि नेतृत्व हे सर्व गुण आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने केवळ आपल्या कामगिरीमुळेच नव्हे, तर मैदानावर आणि मैदानाबाहेर वागण्याच्या पद्धतीमुळेही क्रिकेट विश्वात प्रचंड आदर मिळवला आहे. दबावाच्या परिस्थितीत तो ज्या संयमाने आणि नेतृत्वाने खेळतो, ते मी स्वतः पाहिले आहे आणि हे गुणच विजयाची संस्कृती घडवण्यास मदत करतील.”
या लीगचे सहमालक अभिषेक बच्चन यांनी रहाणेचे स्वागत करताना म्हटले, “‘स्टीव्ह वॉ यांच्या ‘अॅमस्टरडॅम फ्लेम्स’मध्ये अजिंक्य रहाणेचे सामील होणे ही फ्रँचायझी आणि या लीगसाठीही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. तसेच युरोपमध्ये क्रिकेटचा विस्तार वेगाने करण्याच्या आमच्या ध्येयातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अजिंक्यसारख्या दर्जाचे खेळाडू केवळ स्पर्धेचा दर्जाच उंचावत नाहीत, तर युरोपमधील आगामी पिढीच्या क्रिकेटपटूंना प्रेरणा देतात आणि त्यांना मार्गदर्शनही करतात. या कुटुंबात त्याचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
युरोप हे क्रिकेटचे आशादायक केंद्र बनू शकते: अजिंक्य ‘अॅमस्टरडॅम फ्लेम्स’मध्ये सामील होण्याबाबत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, खेळाडूंनी हा खेळ ज्या स्थितीत स्वीकारला, त्यापेक्षा अधिक सक्षम आणि समृद्ध स्थितीत तो पुढच्या पिढीकडे सोपवणे ही त्यांची जबाबदारी आहे. युरोपमधील क्रिकेट आता एका रोमांचक टप्प्यावर आहे आणि तिथे क्रिकेटच्या विकासासाठी प्रचंड वाव आहे. युरोप हे क्रिकेटचे एक अत्यंत आशादायक केंद्र बनू शकते.”

























































