
मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यायला आताशी सुरुवात झाली आणि हे आरक्षण रद्द करण्याचा सपाटाही सुरू झाला. आरक्षण रद्द करण्याचे पत्र दस्तुरखुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले. बावनकुळेंमध्ये जात एवढी ठासून भरलीय का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. तुम्ही आरक्षण रद्द करून बदला घेणार असाल तर आम्ही तुम्हाला पाडून बदला घेऊ, असा निर्वाणीचा इशारा बीडमध्ये जरांगे पाटील यांनी भाजपाला दिला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. निर्णय घेताना प्रामाणिकपणा असावा. त्यात कोणते षडयंत्र नसावे. आम्ही संघर्ष करून आरक्षण मिळवले.
मराठा समाज प्रचंड अडचणीत आहे. मराठा समाजाचे गोरगरीब हलाकीचे जीवन जगत आहे. अशा परिस्थितीत समाजाला आरक्षण द्यायला सुरुवात झाली आणि ते रद्द करायलाही सुरुवात झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रद्द करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. ५० वर्षांच्या काळात एकाही मराठा मंत्र्याने ओबीसीचे आरक्षण रद्द करावे म्हणून पत्र दिले नाही.
बावनकुळेंमध्ये त्यांची जात एवढी ठासून भरलीय का? असा प्रश्न उपस्थित केला. २९ ऑगस्टला टोकाचे आंदोलन होणार असल्याचा इशारा देत भाजपाच्या मंत्र्याने केलेली चूक भाजपाने सुधरावी. जर तुम्ही आरक्षण रद्द करून मराठ्यांचा बदला घेणार असाल तर आम्हीही तुम्हाला निवडणुकीत पाडून बदल घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाला दिला.





























































