सीटबेल्ट लावण्यास मुलाचा नकार, कॅनेडियन एअरलाईन्सकडून विमानसेवा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानातून प्रवास करणाऱ्या लहान मुलाने सीटबेल्ट लावण्यास नकार दिल्याने कॅनेडियन एअरलाईन्सने विमानसेवाच रद्द केली. परिणामी प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले. व्हिक्टोरियाहून टोरोंटोला विमान चालले होते. अखेर सदर मुलाला आणि त्याच्या आईला विमानातून खाली उतरवण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी विमान टोरोंटोकडे रवाना झाले.

एनटीडीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोर्टर एअरलाईन्सचे PD444 हे विमान व्हिक्टोरियाहून टोरोंटोला चालले होते. व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल सोडून धावपट्टीकडे निघाले होते. यादरम्यान एक मुलगा सीटवर उभे असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. केबिन क्रू आणि मुलाच्या पालकांनी सीटबेल्ट लावण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा ऐकेना. अशा असुरक्षित स्थितीत विमान उड्डाण करू शकत नव्हते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टर्मिनलवर परतण्याचा आणि प्रवाशांना खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.

विमान टर्मिनलमध्ये पोहचताच त्या लहान मुलाला आणि पालकांना त्यांच्या सामानासह विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर उड्डाण योजना पुन्हा दाखल करणे आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करणे यात स्थानिक वेळेनुसार रात्रीचे 12.30 वाजून गेले. याच वेळी रात्रीसाठी धावपट्टी बंद करण्यात आली. यामुळे विमानातील प्रवाशांना व्हिक्टोरियामध्येच रात्र काढावी लागली. पोर्टर एअरलाईन्सने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली.