
मुलुंड चेक नाक्याजवळ बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बसला झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बसचालकाने मद्यपान केल्याचा संशय आहे. त्याच संशयातून चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून चाचणीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. शैलेश वाघ असे बसचालकाचे नाव आहे. पालिकेच्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी बसचालकाविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बस मुलुंड पोलिसांच्या अद्याप ताब्यात असून मुलुंड पोलीस ठाण्यामार्फत अधिक तपास केला जात आहे.
बेस्टच्या ताफ्यातील मातेश्वरी कंपनीच्या बसने शुक्रवारी दुपारी मुलुंड चेकनाक्याजवळ पालिकेच्या महिला सफाई कामगाराला धडक दिली. यात कामगार महिलेचा मृत्यू झाला. जयश्री भानाजी परमार (56) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलुंड चेक नाक्याजवळ रस्ता ओलांडत असताना परमार यांना बसची जोरदार धडक बसली. कंत्राटी बसच्या वाढत्या अपघातांमुळे पादचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



























































