
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा ऑनड्युटी असताना मृत्यू झाला. हृदयविकारामुळे पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. गणेश रायते (41) असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून, ते मुंबई पोलिसांच्या एलए-4 युनिटमध्ये कार्यरत होते.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कर्तव्यावर असताना शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रायते यांची प्रकृती अचानक खालावली आणि ते जागीच कोसळले. तेथे उपस्थित पोलिसांनी त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गणेश रायते यांच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे सहकारी पोलीस आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.




























































