
मुसळधार पावसामुळे कर्जतच्या सुगवे-नालधेवाडी मार्गावरील छोट्या पुलाखालील मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग खचला असून अपघाताची शक्यता आहे. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. यात एसटी बससेवादेखील बंद झाल्याने शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यात जुलै महिन्यात संततधार पाऊस झाला. याचा फटका ग्रामीण भागातील अनेक गावांना बसला आहे. सुगवे -नालधेवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील साकवाजवळील रस्ता खचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने गेल्या दहा दिवसांपासून परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत पायी जाण्याची वेळ आली आहे. दहा दिवसांनंतरही दुरुस्ती केली जात नसल्याने एसटी बस सेवा बंद पडली आहे. ग्रामस्थांबरोबरच विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.
दुर्घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग येणार का?
सुगवे-नालधेवाडी मार्गावर असलेली ही जुनी मोरी (साकव) केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल केला आहे.






























































