
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गद्दार खासदारांची भेट घेण हा मोठा गुन्हा आहे. जे खासदार एका पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन नंतर दुसऱ्या पक्षात जातात आणि मोदी त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात, हा संविधानाचा अपमान आहे. ज्या खासदरांच्या विरोधाच न्यायालयात खटला सुरू असून निकालही लागलेला नसताना त्यांची भेट घेणं म्हणजे मोदीं पक्षांतराला आणि गद्दारांना समर्थन करतायत. अशा प्रकारे संविधानाचा अपमान करून खासदारांची भेट घेणं म्हणजे न्यायालयावर दबाव आणण्याचा मोदींचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शनिवारी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
‘गद्दार लोकांना जमवता, त्यांना चहाला, जेवायला बोलवतात आणि मग आश्वासन देता. देशाच्या पंतप्रधानांनी अशाप्रकारे पक्षपाती वर्तन करणं हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे संजय राऊत म्हणाले. गेली 25 वर्ष मी खासदार आहे मग मोदी आम्हाला का नाही बोलवत? आमच्या इतर खासदारांना का नाही बोलवत? काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना का नाही बोलवत? राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चहापान होतं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चहापान होतं, चर्चाही होते, ही एक परंपरा आहे. इतरही पक्ष आहेत समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाचे नेते किंवा डावे पक्ष असतील त्यांना का नाही बोलवत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या या बैठकीला ‘कॅटरिंग सर्व्हिस’ असे संबोधत ती गद्दारांसाठी असल्याची टीका त्यांनी केली.
‘मोदी न्यायालयावर दबाव आणताय का?’
गद्दार खासदारांवरील खटल्याचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, पंतप्रधानांनी त्यांना भेटून “मी तुमच्या पाठीशी आहे” असे म्हणणे म्हणजे थेट न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. पंतप्रधान मोदी गद्दार खासदारांना जिलेबी, ढोकळा खायला बोलवतात. पण गेले 15 दिवसांपेक्षा जास्त काळापासून ते संसदेत येऊ शकले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून ना नरेंद्र मोदी आणि ना ही अमित शहा सभागृहात आलेले नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जर मोदी या देशातील कायद्याचे आणि संविधानाचे रक्षक असतील तर त्यांनी पथ्य पाळलं पाहिजे. संसदेत या आम्ही तुम्हाला खायला देतो, असा उपरोधिक टोमणा त्यांनी लगावला.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांविरोधात न्यायालयात अपात्रतेचा खटला सुरू आहे. तसेच शिवसेनेचे सहा गद्दार खासदार तुम्हाला भेटले त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. याचा निकाल लागालेला नाही, तरी तुम्ही त्यांना भेटताय? म्हणजे पक्षांतराला आणि गद्दारीला पंतप्रधान उघडपणे समर्थन देत आहेत का?, असा सवाल त्यांनी विचारला. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेली खासदार दुसऱ्या पक्षात जातात आणि मोदी त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात, हा सर्रास संविधानाचा अपमान असल्याचे संजय राऊत म्हणाले. मोदींनी त्यांना भेटणं हाच गुन्हा आहे. गद्दारांना पंतप्रधान किंवा गृहमंत्री विश्वास देतात का? ही या देशाची परंपरा काय आहे? हा देश नौतिकतेच्या करंगळीवर उभा आहे. या हिंदुस्थानात रामायण, महाभारतही झालं तेही नौतिकतेच्या मुद्द्यावर घडलेलं आहे, असे संजय राऊत यांनी अधोरेखित केले आहे.
मिंधेंना झोप लागत नाही!
सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे मिंधेंना झोप लागत नसल्याची टीका करत संजय राऊत यांनी केली. नरेंद्र मोदी मिंधे गटाचे प्रमुख आहेत, ती एक मोदी-शहांची कंपनी आहे, त्यामुळे त्यांना हिशोब द्यायला जावेच लागते, असे म्हणत संजय राऊत यांनी मिंधे गटावर टीका केली.




























































