मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेला पट्ट्याने मारहाण; आरोपीला 12 तासांत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीटवरून झालेल्या वादातून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलेला पट्ट्याने मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीच्या गोवंडीतून मुसक्या आवळल्या. मोहम्मद रिझवान अन्सारी असे आरोपी नाव आहे.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी स्थानकाजवळ धावत्या रेल्वेमध्ये ही घटना घडली. सीटवरून आरोपी आणि सदर महिला प्रवाशामध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने महिलेला शिवीगाळ करत महिलेला पट्ट्याने मारहाण केली. 6 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे जीआरपीने आरोपी मोहम्मद रिझवान अन्सारी याला मुंबईतील गोवंडी परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने दावा केला की, त्याने ज्या व्यक्तीवर हल्ला केला ती महिला नसून एक तृतीयपंथी होती. पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.