
मुंबईत घर घेण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या खारघरने आता चांगलाच भाव खाल्ला आहे. खारघरमधील एका भूखंडाला सात लाख सात हजार रुपये प्रतिचौरस मीटर इतका विक्रमी दर मिळाला आहे. या भूखंडाची विक्री सुमारे सात कोटी रुपये गुंठा या दराने झाल्याने सिडको मालामाल झाली आहे. या भूखंडाच्या व्यवहारातून सिडकोला सुमारे पावणे तीनशे कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर खारघरमधील भूखंडांना मोठी मागणी आहे. नुकत्याच झालेल्या ई-लिलावात खारघर सेक्टर १५ मधील ३ हजार ९९९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला तब्बल ७लाख ७ हजार रुपये प्रतिचौरस मीटर असा विक्रमी दर मिळाला. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नवी मुंबईतील विविध नोडमधील निवासी, वाणिज्यिक तसेच अन्य वापराचे भूखंड ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी काढले होते. खारघर सेक्टर १५मधील भूखंडासाठी ड्रीम अभिनंदन इन्फ्रा यांनी सर्वाधिक बोली लावली. प्रतिचौरस मीटरच्या दराने सात लाखांचा टप्पा ओलांडल्याने अन्य स्पर्धकांनी बोलीतून माघार घेतली आणि या भूखंडावर ड्रीम अभिनंदनचे शिक्कामोर्तब झाले.
- खारघर सेक्टर ५ ए मधील एका मोठ्या भूखंडालाही सुमारे साडेतीन लाख रुपये प्रतिचौरस मीटरचा दर मिळाला असून या व्यवहारातून सिडकोला सुमारे ५१४ कोटी रुपये मिळणार आहेत.
- कामोठे सेक्टर ५२मधील एका भूखंडाला २ लाख ३५ हजार रुपये प्रतिचौरस मीटरचा दर मिळाला असून त्यातून सुमारे ३६० कोटी रुपये, तर दुसऱ्या भूखंडातून २६८ कोटी रुपये सिडकोला मिळणार आहेत.
- द्रोणागिरी सेक्टर ४७मधील भूखंडाला १ लाख ९१ हजार ७०० रुपये प्रतिचौरस मीटरचा दर मिळाला असून त्यातून सुमारे १८४ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
कॉर्पोरेट पार्कमुळे मागणी वाढली
खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क उभे राहत आहे. दुसरे बीकेसी म्हणून या पार्कची ओळख निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, खारघर तुर्भे टनेल आणि परिसरातील वाहतूक प्रकल्पांमुळे खारघर, कामोठे आणि द्रोणागिरी परिसरातील भूखंडांना विकासकांकडून वाढती मागणी आहे.






























































