मी गद्दारांच्या पाठीशी असा धमकीवजा संदेश मोदी कुणाला देत आहेत? – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.  जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी भेटायला मोदींना वेळ नाही. संसदेत यायला वेळ नाही. पण गद्दारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे. आणि मोदी महाशय या गद्दारांना सांगताहेत की, मी तुमच्या पाठिशी आहे. म्हणजे हा संदेश ते कोणाला देताहेत? सुप्रीम कोर्टाला धमकावताहेत का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.

गेल्या चार वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या बाबतीतील प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली आहे. मी आजपर्यंत कधीही आणि यापुढेही हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. आमची साधी अपेक्षा अशी आहे की, संविधानाप्रमाणे निकाल दिला जावा आणि तो लागेल याची खात्री आहे न्यायालयाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आणि विश्वास आहे. परंतु, सध्या देशामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण पाहिल्यानंतर मला त्या वातावरणाबद्दल आणि ज्या काही घटना घडताहेत त्याच्याबद्दल बोलणं हे भाग आहे असं मला वाटतं. म्हणून आज मी आपल्याशी संवाद साधत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकूणच सध्या देशात राजकारणात सध्या मतलबी वारे सुरू आहेत. जे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जातात त्यांना वाटतं विरोधी पक्ष थंड होतात. पण आम्ही थंड होणाऱ्यातले नाही. देशातली परिस्थिती पाहिली तर कमी दाबाचा पट्टा आता तयार झालेला आहे. आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असं एकूण चित्र या देशात आहे, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

गेले महिने दोन महिने देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या तरुणाईने म्हणजे जेन-झीने आपल्या सरकारला कसं गुडघ्यावर आणलं याची चर्चा सुरू आहे. मला एका गोष्टीचं वैशम्य वाटतं की, या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले. काहींना तर जालियनवाला बागेच्या हत्याकाडांची आठवण व्हावी, अशा पद्धतीने अत्याचार केले गेले. पण आठवण तर केलीच पाहिजे. लाठीला खिळे लावून मारले गेले. अश्रूधुर सोडले गेले. पॅलेट गनने त्यांच्यावर छरे मारले गेले. कुणाची डोकी फोडली कुणाचे पाय मोडले. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यांना देशद्रोही संबोधन्यात आल्ं. एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानची तयारी नाहीये आणि त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागंतय. हे अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केलेत. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा प्रश्न काही सुटत नाही. तर संपूर्ण सरकार आता बदललं गेलं पाहिजे.. मधल्या काळात न्यायमूर्ती जामदार म्हणाले होते की, त्यांच्याकडे म्हणजेच भाजपकडे वाॅशिंग मशीन आहे. कुणी किती गुन्हे करा, वाॅशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर ते धुतले जातात. आताही तोच मुद्दा आहे….

ही बातमी म्हणजे पंतप्रधान आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत, त्या तरुणांना ते भेटत नाहीत. रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेन्डस् म्हणून त्यांना इन्स्टाग्रामवरून संदेश देतात. म्हणजे ही सुद्धा आता एक बघण्यासारखी गोष्ट आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा मी फेसबुक लाइव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुकवरून सरकार चालत नाही. आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची हालत खराब झालेली आहे. जे काँग्रेसला जमलं नाही. गेल्या 60 वर्षांमध्ये ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसनी त्यांच्या डोळ्यादेखत एवढ्या शिव्या कधीही खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा यांना कमीपणा वाटतो. मात्र, ज्या गद्दारांनी शिवसेना चोरून शहासेना स्थापन केली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवताहेत ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांना वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा मुंबईत होते. त्यांचं आगत स्वागत या गद्दारांनी केलं असेलच. गद्दार खासदार मोदी यांना नुसते भेटलेच नाहीत तर, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं मोदी महाशय या गद्दारांना सांगतात. या गद्दारांना चिंता कसली आहे, हे आता वॉशिंग मशीनमध्ये गेलेत डाग तर धुतले गेलेत. मात्र, गद्दारीचा डाग हा धुतला जात नाहीये. ते डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेले नाहीये, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

देशातले तरुण त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना लाठ्याकाठ्या चालवता त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाहीत तर, मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगताहेत. हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला हवं होतं. आता हे जे काय वाक्य आहे ते वाक्य कशासाठी उद्गारलं. बंद दाराच्या चर्चेआडचं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं नेमकं कारण काय? कोणाला तुम्ही संदेश देताय. सहा खासदार शिवसेना सोडून महिना झाला. लोकसभा अध्यक्षांनी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिला. कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना भेटण्याचं कारण काय? चिंता करू नका मी तुमच्या पाठीशी हा संदेश ते नेमका कुणाला देताहेत हे कोर्टाला धमकवातहेत का? मागे असं व्हायचं शहासेनेच्या प्रमुखाला भेटायचे. आता त्यांचा बॉस आता बदललाय. शहा इकडे असताना ते मोदींना भेटताहेत. धमकीवजा संदेश मोदी कुणाला देताहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हे असं वातावरण निर्माण केलं जातंय. ही लढाई आता शिवसेनेपुरती मर्यादीत राहिली नाही. हा गद्दारीचा व्हायरस संपूर्ण देशात पसरलाय. गद्दारी करा, आमच्याकडे या मी तुमच्या पाठीशी आहे. असा हा संदेश किंवा धमकी मोदींनी नेमकी कुणाला दिलीय? इतर पक्षातील गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिलीय. ही लढाई शिवसेनेपुरती मर्यादीत राहिलेली नाही. लोकशाही आणि संविधानावर प्रेम असणाऱ्या आपण सगळ्यांनी ही लढाई एकत्रित मिळून लढण्याची गरज आहे. देशातील तरुणांचं माथं भडकलंय… ही गोष्ट गंभीर आहे. धमकीवजा संदेश आणि गद्दारांना असं नेमकं भय कसलं आहे? ज्यांना संविधान वाचवायचं आहे लोकशीही वाचवायची आहे त्यांनी या लढाईत सहभागी व्हावं, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.