
डोंबिवलीतील विविध प्रभागांमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. उघडे डीपी आणि उघड्या तारांमुळे नागरिकांना शॉक लागून जीव धोक्यात येऊ शकतो. तरीही अधिकारी लक्ष देत नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महावितरणवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
डोंबिवली (पश्चिम) शहर शाखेच्या वतीने महावितरणच्या आनंदनगर येथील कार्यालयात शिवसैनिकांनी धडक दिली. शहरप्रमुख सुरेश परदेशी आणि शहर संघटक प्रियांका विचारे यांनी विद्युत अभियंता शिल्पा दडपे यांच्यासमोर विजेच्या समस्येचा पाढा वाचला. डीपी उघडे तसेच तारा लोंबकळत असल्यामुळे दुर्घटनेची भीती असून तातडीने महावितरणने दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, चेतन म्हात्रे, कार्यालयप्रमुख राजू पवार, दिलीप गावडे, विभागप्रमुख शेखर चव्हाण, अक्षय मात्रे, अनिल मुथा, सुधाकर चव्हाण, सुभाष मोरे, संजीवन इंगळे, वैखरी साळुंके, विजय कदम, शाखाप्रमुख किरण म्हात्रे, अनिल विश्वकर्मा, सौरभ गुजर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते
आंदोलनाचा इशारा
शिवसेनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तातडीने महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा करावी. डोंबिवलीतील वीज समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख सुरेश परदेशी आणि शहर संघटक प्रियांका विचारे यांनी दिला.






























































