पंचतारांकित हॉटेलच्या किचनमध्ये धक्कादायक प्रकार! मुदत संपलेले दूध, सडलेल्या भाज्या अन् शाकाहारी-मांसाहारी पदार्थ एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंचतारांकित हॉटेल म्हटलं की स्वच्छता, दर्जा आणि सुरक्षित अन्नाची हमी मिळेल, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. मात्र बंगळुरूमधील काही नामांकित 3-स्टार आणि 5-स्टार हॉटेल्सच्या तपासणीत समोर आलेल्या धक्कादायक प्रकारांनी या अपेक्षांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुदत संपलेले अन्न, बुरशी लागलेल्या भाज्या, अयोग्य साठवणूक आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थ वेगवेगळे न ठेवण्याचे प्रकार तपासणीत आढळून आले आहेत.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पथकाने बंगळुरूमधील 26 प्रमुख 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान सुमारे 35 खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. काही ठिकाणी मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. खाद्यपदार्थांवरील लेबलिंग आणि ब्रँडिंगही नियमांनुसार नसल्याचे समोर आले. याशिवाय काही खाद्यपदार्थांची साठवणूक करण्याची पद्धतही अयोग्य असल्याचे तपासणीत आढळले. खाद्यपदार्थ योग्य तापमानात आणि योग्य पद्धतीने ठेवले जात आहेत की नाही, याबाबतही गंभीर त्रुटी आढळल्या.

या तपासणीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही हॉटेल्समध्ये बुरशी लागलेल्या भाज्या देखील आढळून आल्या. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी अशा भाज्यांचा वापर होण्याची शक्यता असल्याने अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे ठेवण्याच्या मूलभूत नियमांचेही पालन काही ठिकाणी होत नसल्याचे आढळले. त्यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

FSSAI पथकाने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे नमुने घेतले. यामध्ये चहा पावडर, चिकन, मटण, मासे, खाद्यतेल, मिरची पावडर, हळद पावडर, टोमॅटो सॉस, लिंबाचा रस, चीज, पापड, काजू, आले, काळी मिरी पावडर, विविध मसाले आणि दूध यांचा समावेश आहे. हे सर्व नमुने अन्न प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित खाद्यपदार्थांमध्ये दर्जाची किंवा सुरक्षिततेची समस्या आढळते का, हे स्पष्ट होणार आहे.

तपासणीदरम्यान आढळलेल्या अनियमिततेप्रकरणी संबंधित अन्न व्यवसाय चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. FSSAI कडून देशभरात अन्न भेसळ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबवली जात आहे.