
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये 13 ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच संघाला दुखापतीने ग्रासलं आहे. ‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, सध्या 13 हिंदुस्थानी खेळाडू बंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहेत. जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी यांसारखे स्टार खेळाडू आधीच दौऱ्याबाहेर झाले आहेत, तर वॉशिंगटन सुंदर आणि साई सुदर्शन यांच्या फिटनेसबाबतही अद्याप संभ्रम कायम आहे.
बुमराहच्या डाव्या गुडघ्याला सूज असल्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही निश्चित कालमर्यादा ठरलेली नाही. दुसरीकडे, हार्दिक पंड्याला दुखापतीतून सावरताना उजव्या पिंडित दुखापतीचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्याला काही काळ गोलंदाजी आणि धावणे थांबवावे लागले होते. आता उपचारांनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याने पुन्हा धावण्यास सुरुवात केली आहे. तसेच, श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून साई सुदर्शन उजव्या पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
कोलंबो येथील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या हाताच्या बोट्याला दुखापत झाल्यामुळे तो मैदानात उतरला नाही आणि त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत संशय निर्माण झाला आहे. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने चांगली कामगिरी करत आपला दावा मजबूत केला आहे.


























































