परदेशात नोकरीचे आमिष दाखवत 11 लाख उकळले, मग नागपूरच्या महिलेची पोर्तुगालमध्ये विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात नोकरीचे आमिष दाखवत 11 लाख रुपये उकळले. मग नागपूरच्या महिलेला पोर्तुगालला नेऊन एका बिअर शॉप मालकाला विकल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुण्यातील एका एजन्सीच्या संचालकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मूळची नागपूरची असलेल्या महिलेला इन्स्टाग्रामद्वारे पुण्यातील ‘वी मायग्रेट’ या कन्सल्टन्सीबद्दल माहिती मिळाली. महिलेने एजन्सीशी संपर्क साधला असता, चालकांनी तिला पोर्तुगालमध्ये दरमहा 1.5 लाख रुपये पगाराची कॅशियर म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच, तिला दिवसातून केवळ आठ तास काम करावे लागेल, असेही सांगण्यात आले.

व्हिसा आणि इतर कागदपत्रांच्या नावाखाली, त्या भामट्यांनी महिलेकडून टप्प्याटप्प्याने एकूण 11 लाख रुपये उकळले. महिला पोर्तुगालला पोहचताच एजंटने तिचा पासपोर्ट हिसकावला आणि तिला दोन दिवस एका खोलीत डांबले. त्यानंतर महिलेला एका बिअर शॉप मालकाला विकण्यात आले. तिथे तिला सक्तीने काम करण्यास भाग पाडले गेले. तसेच तिच्यावर तीव्र मानसिक व शारीरिक अत्याचार करण्यात आले.

महिलेने त्या भामट्यांकडे आपला पासपोर्ट परत मागितला असता त्यांनी तिच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. जवळपास महिनाभर अत्याचार सहन केल्यानंतर महिलेने कशीबशी तिथून सुटका करत पळ काढला. ती आधी बसने लिस्बनला आणि नंतर माद्रिदला गेली. तिथून दोहामार्गे ती हिंदुस्थानात परतली.

देशात परतताच भामट्यांनी तिला माल्टा मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणखी 3 लाख रुपयांची मागणी केली. तिने नकार दिल्यावर त्यांनी तिच्या पतीला जीवे मारण्याची आणि तिला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. अखेर महिलेने पुणे पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. मानवी तस्करी, फसवणूक आणि खंडणी उकळल्याप्रकरणी ‘वी मायग्रेट’च्या चालकांसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.