‘मेट्रो-वन’ मार्गावर ट्रेन फेऱ्यांची संख्या 484 पर्यंत वाढणार; अंधेरी ते घाटकोपर, आझाद नगर ते वर्सोवा ट्रेन धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या ‘मेट्रो-वन’च्या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या विचारात घेत मेट्रो वन प्रशासनाने प्रवासी सेवेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्सोवा ते घाटकोपरपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर थेट ट्रेन फेऱ्या सुरु ठेवतानाच अंधेरी ते घाटकोपर आणि आझाद नगर ते वर्सोवा अशा कमी अंतराच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेस अंधेरी ते घाटकोपरदरम्यान दोन ट्रेन फेऱ्यांमधील अंतर 3 मिनिटे 20 सेकंदावरून 3 सेकंदापर्यंत कमी होणार आहे. तसेच संपूर्ण मार्गिकेवरील एकूण मेट्रो ट्रेन फेऱ्यांची संख्या 476 वरून 484 पर्यंत वाढणार आहे.

मेट्रो वन मार्गिकेने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची कनेक्टिव्हीटी अधिक सुलभ केली. त्यामुळे ही मार्गिका प्रवासी सेवेच्या दृष्टीने अधिक लोकप्रिय ठरली आहे. मार्गावर प्रवासी संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याचे लक्षात घेत मेट्रो वन प्रशासनाने प्रवासी सेवेत मोठे बदल करण्याचे पाऊल टाकले आहे. गर्दीच्या वेळेस मेट्रोची वारंवारता वाढवण्यासाठी ‘मुंबई मेट्रो वन’तर्फे ‘मिक्स्ड-लूप’ (मिश्र फेरी) कार्यपद्धती सुरू केली जाणार आहे. 10 ऑगस्ट पासून संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत ‘मिक्स्ड-लूप’ कार्यपद्धती सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये एक ट्रेन घाटकोपर आणि अंधेरी दरम्यानच्या ‘शॉर्ट लूप’वर (लहान मार्गावर) धावेल आणि त्यानंतरची ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा या नेहमीच्या ‘फुल लूप’वर (पूर्ण मार्गावर) धावणार आहे.

सुधारित कार्यपद्धतीनुसार, अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान गर्दीच्या वेळेस दोन गाड्यांमधील अंतर 3 मिनिटे 20 सेकंदांवरून कमी होऊन ते 3 मिनिटे होणार आहे. यामुळे प्रवासी क्षमता 20 टक्क्यांहून अधिक वाढेल. सुमारे 28,000 अतिरिक्त प्रवासी क्षमता वाढेल. तसेच वर्सोवा आणि आझादनगरदरम्यान गर्दीच्या वेळेस दोन गाड्यांमधील अंतर 362 सेकंद असेल, तर कामकाजाच्या दिवसांतील एकूण ट्रेन फेऱ्यांची संख्या 476 वरून वाढून 484 होणार असल्याचे मेट्रो वन प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.