
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध-वालसावंगी मार्गावर पद्मावती फाट्यावरील शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेटा कार विहिरीत कोसळून सासू-सुनेचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. अकतराबी अमानुल्ला खान आणि सुलतानाबी जियाउल्ला खान अशी मयत सासू-सुनेची नावे आहेत. अल्तमश खान असे जखमी चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धावडा येथील अल्तमश खान हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कारने पारध येथून वालसावंगीकडे जात होते. यादरम्यान पद्मावती फाट्यावर समोर भरधाव दुचाकी आली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने क्रेटा कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत कोसळलेल्या कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रात्रीचा अंधार, खोल विहीर आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले.
घटनेची माहिती मिळताच जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघाबिरसिंह संधू ,भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . नितीन कटेकर पारध ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व इतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले.
ज्या विहिरीत ही दुर्घटना घडली, त्या विहिरीबाबत काही महिन्यांपूर्वीही प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाले होते. रस्त्यालगत असलेल्या या धोकादायक विहिरीभोवती संरक्षक कठडे, सुरक्षा भिंत किंवा आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही प्रभावी उपाययोजना न झाल्याने अखेर या विहिरीने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा बळी घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.






























































