Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये तरुण व्यावसायिकाने जीवन संपवले, कारण अद्याप अनभिज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अज्ञात कारणातून तरुण व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना संगमेश्वरमधील करंबेळे येथे घडली. प्रदीप प्रकाश पवार (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रदीपच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करंबेळे गावातील महाडीकवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रदीप पवार याचा सर्व्हिसिंग रॅम्पचा व्यवसाय होता. शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता नेहमीप्रमाणे प्रदीप व्यावसायाच्या ठिकाणी गेला होता. मात्र रात्री नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने भावाने त्याला फोन केला. मात्र प्रदीप फोन उचलत नव्हता. अखेर प्रदीपचा भाऊ त्याच्या व्यावसायाच्या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी गेला. तेथे जाऊन पाहिले असता प्रदीपची बाईक बाहेर उभी होती, मात्र शेडचे शटर बंद होते. भावाने शटर उघडून पाहिले असता प्रदीप गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने खाली उतरवले, मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता.

प्रदीप भाऊ प्रशांत पवार याने तात्काळ देवरूख पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेब ए. ए. वेलवणकर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत करत आहेत.