
घरात स्वयंपाकाच्या गॅसमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जोधपूरमधील दोन तरुणांनी एक खास डिव्हाईस तयार केले आहे. या डिव्हाईसमुळे गॅस गळती झाल्यास अलार्म वाजेल, तसेच ग्राहकाच्या मोबाईलवर अलर्टदेखील पाठवला जाईल. जर गॅस बंद केला नाही, तर हे उपकरण स्वतःच गॅसचा पुरवठा थांबवण्याचे काम करेल.
हे डिव्हाईस ‘पवनपुत्र सोल्युशन्स’ या स्टार्टअपमधील वैभव बोहरा आणि भरत सोनी या दोन तरुणांनी तयार केले आहे. “माझ्या आजीने एकदा घरात गॅस उघडाच ठेवला होता; त्यावरून मला या उपकरणाची कल्पना सुचली,” असे या डिव्हाईसचे संस्थापक वैभव बोहरा यांनी सांगितले. हे उपकरण स्वयंपाकघरात सिलिंडरजवळ लावले जाते आणि याचा दुसरा भाग गॅस पाइपमध्ये बसवलेला असतो. गॅस निर्धारित वेळेपेक्षा जास्त प्रमाणात बाहेर पडत असेल आणि शेगडी पेटलेली नसेल, तर ते अलार्म वाजवेल. यासोबतच, वापरकर्त्याच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज पाठवेल.
























































