

‘जंतर मंतर’वर पेपरफुटीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘क्षमा’ करण्याचे नाट्य पंतप्रधान मोदी यांनी उभे केले. हे एकतर्फी क्षमा–नाट्य विद्यार्थ्यांनी झिडकारले. नेल्सन मंडेलांसारख्या अनेक नेत्यांनी ‘क्षमा’ हे शस्त्र बनवले. मोदी दाखवत आहेत ती क्षमा नसून केविलवाणी दया आहे!
पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला ‘दयावान’ मानून ‘जंतर मंतर’वरील आंदोलक विद्यार्थ्यांना माफ केले. या मुलांनी माझ्या आईचा उद्धार केला तरी मी त्यांना माफ करीत असल्याचे मोदी म्हणाले तेव्हा त्यांची पुन्हा एकदा चेष्टा झाली. “मोदीजी, मोदीजी, आम्ही चुकलो. आम्हाला माफी द्या,” असे विनवणारा एकही विद्यार्थी मी पाहिला नाही. मग हे मारून मुटकून माफीनाट्य कशासाठी? श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, “विद्यार्थ्यांवर पॅलेट गन्स चालवल्याबद्दल आणि पेपरफुटीने हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त केल्याबद्दल मोदी यांनीच विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी.” हीच सर्व राजकीय पक्षांची मागणी आहे. माफीचा अर्थ पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतला पाहिजे. राजीव गांधींच्या खुन्यांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी तुरंगात गेल्या. आपल्या पित्याच्या खुन्यांना त्यांनी माफ केले. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींकडे एक ‘दया याचिका’ केली व सांगितले (1999) की, आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना मी माफ केले आहे. त्यांना आता दया दाखवा. त्यानंतर त्या खुन्यांची सुटका झाली. अशी माफी द्यायला मन विशाल व स्वच्छ असावे लागते. माफी देणे व मागणे ही साधी औपचारिकता नाही. प्रेम, संवेदना आणि अहंकार मुक्तीचा मार्ग आहे. अनेकदा मोदींसारखे लोक ‘मी माफ केले’ असे जाहीर करत स्वतःचा अहंकार पोसतात. मोदींना वाटत असावे, आपण विद्यार्थ्यांना माफ केले म्हणजे उपकार केले, पण तसे नाही. हासुद्धा मोदींचा अहंकार आहे.
भरकटलेली मुले
नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केले. या मुलांना त्यांनी ‘भरकटलेली मुले’, ‘वाट चुकलेली मुले’ वगैरे म्हटले. ही काही माफ करण्याची रीत नाही. नेल्सन मंडेला 27 वर्षे तुरंगात होते. दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाल्यावर ते राष्ट्रपती झाले. त्यानंतर एकदा मंडेला आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत एका साध्या रेस्टारंटमध्ये जेवायला गेले. तिथे समोरच्या टेबलावर एक व्यक्ती त्याने दिलेल्या आार्डरची वाट पाहत होती. मंडेलांना आलेले पाहताच त्याने मान खाली घातली व तो बाहेर जाऊ लागला. तेव्हा मंडेलांनी त्याला आपल्या टेबलावर बोलावले. तो माणूस घाबरलेला होता. त्याचे हात-पाय थरथरत होते. मंडेलांनी त्याला आपल्याच टेबलावर जेवायला बसवले. जेवण संपल्यावर तो थरथरत निघून गेला. मंडेला यांनी नंतर सांगितले, “मी ज्या तुरुंगात यातना भोगल्या त्याच तुरुंगाचा हा जेलर होता. आता तो घाबरला आहे. त्याला वाटले मी सूड घेईन, पण सूड घेण्याचा माझा स्वभाव नाही. सुडाची मानसिकता राज्य नष्ट करते, तर क्षमेची मानसिकता राज्ये व समाज घडवते.”
मंडेला यांनी पुढे जे सांगितले ते महत्त्वाचे, “मी त्या जेलरला अनेकदा समजावले. अधिकाराचा गैरवापर करू नकोस. आज बाहेर ज्यांची सत्ता आहे त्यांनाही एक दिवस जावे लागेल. तुरुंगाचे कुलूप उघडून मला मुक्त करायला एक दिवस त्यांना यावे लागेल. या देशावर जेव्हा आमचे नियंत्रण असेल तेव्हा तू काय करशील?” मंडेला यांनी रंगभेद व्यवस्थेतील त्यांच्या विरोधकांना क्षमा केली. ते म्हणायचे, क्षमा आत्मा पवित्र आणि मुक्त करते. माणसाला निर्भय बनवते. मात्र, क्षमा मनापासून केली तरच ते शक्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेली क्षमा या प्रकारात मोडते काय?
जगातली ‘क्षमा’
मानवी हक्कांसाठी लढणारे जाॅन लुईस यांना अमेरिकेच्या तुरुंगात अनेकदा मारहाण झाली. तुरुंगात यातना दिल्या. जाॅन लुईस हे पुढे प्रबळ नेते झाले तेव्हा त्यांना मारहाण करणाऱ्या एका माजी ‘क्लान’ सदस्याने माफी मागितली तेव्हा लुईस म्हणाले, “होय, मी तुला माफ करतो.” लुईस यांनी दिलेल्या माफीत कोणताच अहंकार नव्हता. जाॅन लुईस यांनी क्षमेलाच जीवनशैली बनवले होते. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ द फ्री स्टेटच्या रेक्टरने वर्णभेदासंदर्भात आक्षेपार्ह व्हिडीओ बनवणाऱ्या गोऱ्या विद्यार्थ्यांना क्षमा करून त्यांना पुन्हा विद्यापीठात घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो मोदींप्रमाणेच म्हणाला होता, “मुले भरकटली आहेत. त्यांच्यावर संस्कार करण्यात संस्था व पालक कमी पडले.”
येथे ‘संस्था’ म्हणजे सरकार या अर्थाने घेतले पाहिजे.
मंडेला व इतर
महात्मा गांधी जिवंत राहिले असते तर त्यांनी आपल्यावर गोळ्या झाडणाऱ्यांनाही क्षमा केली असती. आज उत्तर प्रदेश, दिल्लीत जे बुलडोझर व ‘एन्काऊंटर’ राज सुरू आहे ते अस्वस्थ करणारे आहे. धर्म बघून अनेकांची घरे तोडली जात आहेत. दिल्लीत दंगली भडकवल्याचा ठपका ठेवून अनेक विद्यार्थी, नेते वर्षानुवर्षे तुरुंगात आहेत, पण गुजरात दंगलीचे सूत्रधार केंद्रीय सत्तेत बसले आहेत. मंडेला यांनी सत्तेवर येताच क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांचा छळ करणाऱ्या सर्व तुरुंग अधिकाऱ्यांना माफी दिली. रिव्होनिया खटल्यात मंडेला यांना फाशीची शिक्षा मागणारा सरकारी वकील पर्सी युटर. 1995 मध्ये मंडेला यांनी त्याला राष्ट्रपती प्रासादात डिनरला बोलावले आणि सांगितले, “त्याचा काय दोष? त्याने फक्त आपले काम केले होते.” क्रिस्टो ब्रँड हे राबेन आयलंड आणि पाल्समूर तुरुंगातले जेलर. मंडेला यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला क्रिस्टो ब्रँडला बोलावले व व्यासपीठावर खुर्ची दिली. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. किम डाय जंग हे दक्षिण कोरियाचे मानवतावादी नेते. लोकशाही व नागरी स्वातंत्र्यासाठी लढताना ते अनेकदा तुरुंगात गेले. त्यांचा छळ झाला. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 1973 मध्ये टोकियोत एका भाषणासाठी गेले असताना त्यांचे अपहरणही करण्यात आले. पुढे 1997 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी चुन-डु-हवान आणि रो ते वू या दोन माजी लष्करी हुकूमशहांना क्षमा दिली. हेच दोन लोक सातत्याने किम डाय जंग यांच्या हत्येचा प्रयत्न करीत होते. त्यांनी सांगितले की, “राजकीय सूड माझ्याबरोबरच संपला पाहिजे. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण मागील गोष्टी मागेच ठेवल्या पाहिजेत. झनाना गुस्माओ हे पूर्व तिमोरचे क्रांतिकारी नेते. तिमोर इंडोनेशियाच्या ताब्यात असताना त्यांनी स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांना पकडून तुरुंगात डांबले. देश स्वतंत्र झाल्यावर ते राष्ट्रपती झाले. भूमिगत असताना त्यांची माहिती इंडोनेशियन सैन्याला त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने दिली. हा विश्वासघात होता, पण झनाना गुस्माओ यांनी त्या व्यक्तीस क्षमा केली. त्याला मिठी मारून क्षमा केली. तेव्हा लोकांना राग आला. झनाना शांतपणे लोकांत गेले व म्हणाले, “विसरा आता भूतकाळ. एकमेकांना क्षमा करा आणि राखेतून राष्ट्र पुन्हा उभे करा.”
नवे नाटक
पंतप्रधान मोदी यांनी ‘जंतर मंतर’वरील आंदोलकांना मनापासून क्षमा केली काय? शंकाच आहे. मोदी हे संघर्षातून, स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले नेतृत्व नाही. सत्ता मिळवून त्यावर आपली पकड घट्ट करण्यासाठी त्यांनी लालकृष्ण आडवाणींपासून अनेक उपकारकर्त्यांचा काटा काढला. त्या कामी त्यांना अमित शहासारख्यांची साथ मिळाली. अनेक कपट-कारस्थाने केली. धमक्या देऊन विरोधक संपवले. लोकशाही, राज्यघटनेचा खून केला. या प्रवृत्तीविरुद्ध देशातील तरुणांनी बंड केले तेव्हा त्यांना झुकावे लागले. नेहमीप्रमाणे त्यांनी एक नाट्य उभे केले, आंदोलक विद्यार्थ्यांना क्षमा केल्याचे. त्याच वेळी त्यांचे पोलीस आंदोलकांवर देशभरात गुन्हे दाखल करत आहेत. आंदोलक मुलींच्या पालकांना धमक्या देत आहेत. मुलींकडून मोदींची ‘माफी’ मागत असल्याचे व्हिडीओ जबरदस्तीने करून घेत ते समाजमाध्यमांवर टाकले जात आहेत. अमित शहा संसदेत यायला तयार नाहीत. म्हणजे त्यांना तरुणांना दडपण्यासाठी काहीतरी मोठे निर्घृण कारस्थान रचायचे आहे. त्यात ते गुंतले आहेत. राजकीय क्षमा ही अनेकदा सत्ता टिकवण्याचे साधन असते. क्षमा देताना स्वतःकडे नैतिक आत्मबल हवे. मोदींसारख्या ‘पावरबाज’ व्यक्तीकडून ‘क्षमा’ एकतर्फी असेल तर ती ‘दया’ वाटते. त्यात प्रेम, आदर नाही.
मोदींची ‘दया’ देशातील तरुणांनी नाकारली आहे.
जोपर्यंत ते सीबीआय, ईडी, पोलीस, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग या बळावर राज्य करीत आहेत, तोपर्यंत त्यांची ‘क्षमा’ म्हणजे ढोंग आहे. ती ‘क्षमा स्वीकारणे’ हाच अपराध ठरेल!
@rautsanjay61






























































