
>>डॉ. मंजिरी भालेराव<<
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आद्य ऐतिहासिक काळातील राजकीय इतिहासातील घडामोडींचा पट उलगडणारा 24 बौद्ध शैलगृहांचा समूह, `त्रिरश्मी’ लेणीसमूह. प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिक शहरापासून जवळच असणारा हा शैलगृह समूह उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापारी व दळणवळणाच्या मार्गाच्या जवळ असल्याने या स्थानाचे प्राचीनकालीन महत्त्वही स्पष्ट होते.
नाशिक हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले प्राचीन नगर असून याच नावाच्या जिह्याचे ते प्रमुख केंद्र आहे. हिंदू, जैन आणि बौद्ध या तिन्ही धार्मिक परंपरांच्या दृष्टीने नाशिकला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. नाशिक येथील शैलगृहे ही इ. स. पूर्व 1 ल्या शतकापासून ते इ. स. 6 व्या शतकापर्यंतच्या कालखंडातील अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तूसमूह आहेत. उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापारी व दळणवळणाच्या मार्गाच्या जवळ या शैलगृहांची निर्मिती झाल्यामुळे त्यांच्या स्थानाचे महत्त्वही स्पष्ट होते. स्थानिक पातळीवर ही `पांडवलेणी’ या नावाने प्रसिद्ध आहेत. तथापि, शिलालेखांवरून या लेणी ज्या डोंगरात कोरल्या आहेत, त्या डोंगराचे प्राचीन नाव `त्रिरश्मी’ असल्याचे स्पष्ट होते.
आज या परिसराचे पर्यटन स्थळ म्हणून विशेष महत्त्व वाढले आहे. दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले स्मारक तसेच जवळच निर्माण करण्यात आलेला आधुनिक स्तूप यांमुळे या परिसराला एक नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्याच्या परिसरात प्राचीन काळी जमिनीत कोरलेली पाण्याची टाकी अजूनही पाहता येतात. प्राचीन काळी या मार्गावरून जाणारे व्यापारी आणि प्रवासी यांच्यासाठी केलेल्या जलव्यवस्थेची यावरून कल्पना येते. या ठिकाणी एकूण 24 बौद्ध शैलगृहांचा समूह असून त्यांमध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत तसेच संस्कृत-प्राकृत मिश्र अशा भाषांमध्ये एकूण 27 शिलालेख आढळतात. त्यांची निर्मिती इ. स. पूर्व 1 ले शतक ते इ. स. च्या 6 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत विविध टप्प्यांत झाली. नाशिकच्या लेणीसमूहाला सातवाहन तसेच पश्चिमी क्षत्रप राजघराण्यांचा राजाश्रय लाभला. त्याचबरोबर संपन्न भारतीय, शक (पर्शियन) आणि यवन (ग्रीक) व्यापाऱ्यांनीही या लेण्यांच्या निर्मितीसाठी उदार हस्ताने दाने दिली. त्यांची नोंद त्या त्या शैलगृहांमधील शिलालेखात करून ठेवली. त्यामुळे या शैलगृहांचा काळ ठरवायला तर मदत झालीच, पण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आद्य ऐतिहासिक काळातील राजकीय इतिहासातील घडामोडी समजल्या. त्याचबरोबर नाशिक येथील शैलगृहांसारखी रचना असणाऱ्या इतर शैलगृहांचा काळ ठरवता आला आणि पर्यायाने संपूर्ण पश्चिम भारतातील शैलगृहांचा कालापाम ठरवायला मदत झाली. त्यामुळे या लेणी आणि त्यातील शिलालेख हे केवळ धार्मिक वास्तू न राहता त्या काळातील राजकीय सत्ता, व्यापारी जाळे, सामाजिक रचना तसेच धार्मिक संकल्पना आणि धार्मिक स्थापत्यातील परिवर्तन यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे स्रोत ठरतात.
या समूहातील आरंभीच्या लेण्यांपैकी लेणे क्रमांक 19 विशेष उल्लेखनीय आहे. हे लेणे या समूहातील सर्वात प्राचीन लेणे असू शकते. भिक्षूंना राहण्यासाठी केलेल्या या विहाराची निर्मिती सातवाहन कुळातील राजा कन्ह म्हणजे कृष्ण याच्या एका राजकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दानातून इ. स. पूर्व 1 ल्या शतकात झाली. सातवाहन कुळातील सर्वात प्राचीन आणि कृष्ण या राजाचा एकमेव लेख या लेण्यात आहे. या समूहात एकच चैत्यगृह (लेणे क्रमांक 18) आहे. त्याची निर्मिती इ. स. पूर्व 1 ल्या शतकात झाली असावी. या चैत्यगृहातील स्तंभ विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांवर ब्राह्मी लिपीत प्राकृत भाषेत उभ्या स्वरूपात शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखांमध्ये दानकर्ती भटपालिका आणि तिच्या कुटुंबीयांची नावे तसेच त्यांची पदे नोंदविलेली आहेत. या चैत्यगृहाचे मुखदर्शन हे संपूर्णपणे दगडात कोरलेले आहे. अजिंठा येथील लेणे क्रमांक 9, तसेच जुन्नरच्या मानमोडी डोंगरातील भूत लेणे हे यासारखे आहेत. त्याआधीच्या म्हणजे अजिंठा क्रमांक 10, पितळखोरा, भाजे यांसारख्या चैत्यगृहांचे मुखदर्शन पूर्णपणे लाकडाचे होते. त्याऐवजी टिकाऊपणाच्या गुणधर्मामुळे दगडी मुखदर्शन तयार करायला इ. स. पूर्व 1 ल्या शतकात सुरुवात झाली होती. त्याचाच एक उत्तम नमुना नाशिकमधील त्रिरश्मी समूहात पाहायला मिळतो.
या चैत्यगृहातील स्तंभ हे साधे अष्टकोनी आहेत आणि त्यांचे तळ जणूकाही एखाद्या भांडय़ात ठेवावे अशा दगडात कोरलेल्या गोलाकार हंडय़ात ठेवले आहेत, असा आभास निर्माण केलेला दिसतो. बांधीव स्थापत्यामध्ये असे लाकडी स्तंभ पूर्वी भांडय़ात ठेवत असावेत, ज्यामुळे जमिनीतून वाळवी खांबात शिरणार नाही आणि इमारत जास्त काळ टिकेल. या प्रकारचे स्तंभ कोरीव स्थापत्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील शिल्पांकनही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यावर विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. दरवाज्याच्या शेजारी हातात कमळ धारण केलेला रक्षक यक्ष कोरलेला आहे. शेजारील भिंतीवर असलेल्या शिलालेखातून तो यक्ष आहे हे निश्चित होते.
पितळखोरा या ठिकाणी सापडलेल्या यक्ष प्रतिमेची माहिती पाहताना आपण इ. स. च्या 6 व्या शतकातील बौद्ध ग्रंथ `महामायूरी’ या ग्रंथाची माहिती पाहिली होती. या ग्रंथामध्ये काही रक्षक कवच मंत्र दिले आहेत. प्राचीन काळी भिक्षूंना धर्मप्रसारासाठी पायी पायी फिरावे लागे तेव्हा सर्पदंशाची भीती असे. जर साप चावला तर त्यांनी महामायूरी या देवतेचे आवाहन करून या ग्रंथातील मंत्र म्हणायचे, त्याचबरोबर ते ज्या गावात असतील त्या गावातील रक्षक यक्षांना आवाहन करून सर्पदंशाची बाधा होऊ नये, अशी त्यांची प्रार्थना करायची अशी पद्धत होती. त्यासाठी `महामायुरी’ या ग्रंथामध्ये भारतातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांची आणि तेथील रक्षक यक्षांची यादी दिली आहे. यामध्ये नाशिक या ठिकाणी `सुंदर’ नावाच्या यक्षाचा निवास आहे असे नोंदवले आहे. या यक्षाची मंदिरे किंवा मूर्ती होती का, याबद्दल माहिती मिळत नाही. या चैत्यगृहाच्या दरवाज्याशेजारी कोरलेला आणि सामान्य व्यक्ती वाटणाऱ्या, पण धष्टपुष्ट असलेल्या आणि हातात कमळ घेतलेल्या द्वारपालाला शिलालेखात असलेल्या उल्लेखामुळे यक्ष असेच संबोधावे लागते. पण तो `महामायुरी’ ग्रंथातील `सुंदर’ यक्ष होता का हे समजायला आज काहीही मार्ग नाही.
या शैलगृहामध्ये अजून काही शिलालेख आहेत त्यावरून या चैत्यगृहाची निर्मिती दोन-तीन टप्प्यांत झाली होती हे लक्षात येते. एवढेच नाही, तर मुखदर्शनावरील कोरीव कामातूनसुद्धा या निर्मितीमधले टप्पे सहज समजतात. त्यामध्ये असलेला `परकीय हात म्हणजे परदेशी संकल्पनांची अभिव्यक्ती’सुद्धा जाणवते. त्यासंबंधीची माहिती आपण पुढील भागात पाहू.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)





























































