
संत कर्माबाई या संत जनाबाईंच्या विचाराने प्रभावित होत्या. त्या जगन्नाथाला सर्वस्व मानीत असत. जगन्नाथाला सोवळ्याओवळ्याचा काहीच फरक पडत नाही असे त्यांचे म्हणणे होते. केवळ भक्ती आणि विश्वास या दोनच गोष्टी जगन्नाथास प्रिय अशी त्यांची श्रद्धा होती. थंडीपावसातही त्या काकड आरतीला जगन्नाथासाठी ताजी खिचडी तयार करून नेत व नैवेद्य दाखवून तासन्तास त्याच्यासमोर बसून राहात. जगन्नाथ स्वत प्रकट होऊन ती खिचडी ग्रहण करीत असत अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिरातील कडक नियमांमुळे कर्माबाईंना खिचडी न्यायला उशीर होऊ लागला तेव्हा जगन्नाथांनी प्रकट होऊन पुजाऱयांना मला शीरापुरी नव्हे तर कर्माबाईच्या खिचडीचाच नैवेद्य हवा असे सांगितल्याचे मानले जाते. तेव्हापासून आजही जगन्नाथाला कर्माबाईचे प्रेम म्हणून ओवळ्यातील खिचडी नैवेद्य म्हणून दिली जाते.





























































