
>>डॉ. संजय वर्मा
पावसाळ्यातील दमट रात्र… शहराच्या कृत्रिम प्रकाशापासून दूर एखाद्या नदीकाठी किंवा दाट झाडीत काही क्षण शांतपणे उभे राहिल्यास हवेत तरंगणाऱ्या असंख्य लुकलुकणाऱ्या प्रकाशबिंदूंचे मोहक दृश्य पाहायला मिळते. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे काजवे. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये आणि वेगाने कीँटच्या जंगलात रूपांतरित होत असलेल्या शहरांमध्ये काजव्यांची ही जादुई रोषणाई आता दुर्मीळ होत चालली आहे.
काजवे हे सौंदर्याचे प्रतीक तर आहेतच, पण त्याबरोबरीने ते निरोगी परिसंस्थेचे महत्त्वाचे निदर्शक मानले जातात. अनेकांना काजवे म्हणजे उडणारे कीटक वाटतात, परंतु ते माशी नसून भुंगे कुळातील (बीटल) लॅम्पिरिडी कुटुंबातील जीव आहेत. त्यांची सर्वात विलक्षण वैशिष्टय़पूर्ण क्षमता म्हणजे जैवप्रकाश (बायोल्युमिनेसन्स). शरीरातील विशिष्ट रासायनिक प्राक्रियेमुळे ते स्वत प्रकाश निर्माण करतात. हा प्रकाश केवळ आकर्षक नसून त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. नर काजवे आपल्या विशिष्ट लुकलुकण्याच्या पद्धतीद्वारे मादी काजव्यांना आकर्षित करतात. म्हणजेच त्यांचा प्रकाश हा केवळ दृश्य अनुभव नसून त्यांची संवादपद्धती आणि प्रणयभाषाच असते.
वैज्ञानिकांच्या मते, ज्या परिसरात काजवे आढळतात, तेथील माती, पाणी, आर्द्रता आणि पर्यावरणीय संतुलन चांगले असल्याचे मानले जाते. त्यामुळे काजव्यांची उपस्थिती ही निरोगी परिसंस्थेचे प्रतीक ठरते. याउलट त्यांची संख्या कमी होणे म्हणजे त्या परिसरातील नैसर्गिक समतोल बिघडत असल्याचा स्पष्ट इशारा असतो. आज कृत्रिम प्रकाशामुळे रात्रीचे नैसर्गिक अंधाराचे वातावरण झपाटय़ाने कमी होत असून त्यामुळे निसर्गाची जैविक लयच विस्कळीत होत आहे. काजव्यांचे कमी होणे ही त्याचीच गंभीर सूचना मानली जात आहे.
महानगरांमध्ये काजव्यांची संख्या घटण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रकाश प्रदूषण. दिल्लीतील अरवली परिसर, रिजचे जंगल किंवा यमुना नदीकाठची झाडी पूर्वी काजव्यांनी उजळून निघत असे. मात्र रस्त्यांवरील तेजस्वी दिवे, उद्यानांतील एलईडी प्रकाशयोजना, उंच इमारती आणि घरांमधून पसरणारा कृत्रिम प्रकाश यामुळे अंधाराचे नैसर्गिक क्षेत्र जवळपास नष्ट झाले आहे. तज्ञांच्या मते, अतितीव्र प्रकाशामुळे नर आणि मादी काजव्यांना एकमेकांचा प्रकाश ओळखणे कठीण होते. परिणामी त्यांचे प्रजनन पा विस्कळीत होते, त्यांना जोडीदार मिळत नाही आणि पुढील पिढीच धोक्यात येते. अलीकडे या परिस्थितीची दखल घेत काजव्यांच्या संवर्धनासाठी काही सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. `काजवा वॉक’ या उपक्रमातून निसर्गप्रेमींच्या गटांकडून काजव्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येते. ही बाब आशादायी आहे. कारण काजव्यांचा शोध घेणे म्हणजे केवळ निसर्गभ्रमंती नव्हे, तर पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करणारी जनजागृती मोहीम आहे. अंधारात काजवे शोधताना माणूस नकळत त्या परिसंस्थेशी भावनिक नाते जोडतो. जगातील अनेक देशांनी काजव्यांच्या संवर्धनाला पर्यटन आणि पर्यावरण संरक्षणाशी जोडले आहे. विदेशांप्रमाणेच भारतातही पश्चिम घाटातील फायरफ्लाय फेस्टिव्हल पर्यावरणप्रेमींमध्ये लोकप्रिय होत आहे. महाराष्ट्रातील भंडारदरा, पुरंदर, सह्याद्री परिसर तसेच काही संरक्षित वनक्षेत्रांमध्ये पावसाळ्यात हजारो पर्यटक केवळ काजव्यांच्या लुकलुकत्या प्रकाशाचा अनुभव घेण्यासाठी पोहोचतात.
काजव्यांचे महत्त्व लक्षात घेऊन भारतात यंदा प्रथमच त्यांच्या 92 प्रजातींची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीतील सुमारे 61 टक्के प्रजाती या केवळ भारतातच आढळणाऱ्या आहेत. ही यादी तयार होणे म्हणजे काजवे संवर्धनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. कारण अनेक ठिकाणी त्यांचे अस्तित्व आता मोजक्या भागांपुरते मर्यादित राहिले असून त्यांच्या प्रजननावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
जगभरात काजव्यांच्या 2,400 हून अधिक प्रजाती आढळतात. त्यांच्या पोटाच्या खालच्या भागात ल्युसिफेरिन नावाचे रासायनिक द्रव्य असते. ऑक्सिजनच्या संपर्कात आणि ल्युसिफेरेज या विकराच्या साहाय्याने या द्रव्याची रासायनिक प्राक्रिया घडते व त्यातून प्रकाश निर्माण होतो. या प्राक्रियेत जवळपास 90 ते 95 टक्के ऊर्जा प्रकाशात रूपांतरित होते आणि उष्णता जवळपास निर्माण होत नाही. त्यामुळे या प्रकाशाला शीतप्रकाश असे म्हटले जाते. निसर्गातील सर्वाधिक कार्यक्षम प्रकाशनिर्मितीच्या प्राक्रियांपैकी ही एक मानली जाते.
काजव्यांचे जीवन पावसाळा, वातावरणातील आर्द्रता आणि योग्य तापमानाशी घट्ट जोडलेले असते, परंतु अनियमित पाऊस, वाढते तापमान, अचानक होणारा अतिवृष्टीचा मारा आणि दीर्घकाळ टिकणारे दुष्काळ यांमुळे त्यांचे संपूर्ण जीवन विस्कळीत होत आहे. याशिवाय हरितक्रांतीनंतर वाढलेल्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरानेही काजव्यांवर गंभीर परिणाम केला आहे. काजव्यांचे नाहीसे होणे हे परिसंस्थेतील मोठय़ा बदलाचे संकेत आहेत. त्यांची संख्या घटू लागली की, त्या परिसरातील मातीची गुणवत्ता, आर्द्रता, जैवविविधता आणि अन्नसाखळी यांमध्ये बिघाड होत असल्याचे संकेत मिळतात. म्हणूनच शास्त्रज्ञ काजव्यांना निरोगी परिसंस्थेचे जैविक निदर्शक मानतात.
निसर्गातील असंख्य जिवांसाठी अंधार हीदेखील तितकीच आवश्यक गोष्ट आहे, जितका माणसासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. काजव्यांचा शोध म्हणजे प्रत्यक्षात निसर्गातील हरवलेल्या संतुलनाचा शोध. त्यांच्या लुकलुकत्या प्रकाशामध्ये केवळ सौंदर्य दडलेले नसते, तर पर्यावरण अजूनही श्वास घेत असल्याचा आश्वासक संदेश दडलेला असतो.


























































