
अत्याचारानंतर कोयत्याने वार करून चिमुकलीची निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रफुल्ल घोषे असे या आरोपीचे नाव आहे. २७ सप्टेंबर २०२१ मध्ये त्याने हे क्रूर कृत्य केले होते. पालघर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. रहाणे यांनी हा निकाल दिला.
प्रफुल्ल घोषे हा पीडित मुलीच्या शेजारीच राहात होता. चिमुकलीला आईने दुकानात सामान आणण्यासाठी पाठवले होते. याचदरम्यान नराधम प्रफुल्लने पीडित चिमुकलीला जबरदस्ती आपल्या घरात नेले. मोबाईलवर अश्लील फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि खाऊसाठी १० रुपये दिले. मात्र असह्य वेदनेमुळे चिमुकलीने ‘मी हा सर्व प्रकार माझ्या वडिलांना सांगते’ असे म्हणत घराकडे पळ काढला होता. मात्र आपले बिंग फुटेल या भीतीने कोयता घेऊन तिचा पाठलाग केला आणि रस्त्यावरच चिमुकलीवर १५ वार करून हत्या केली होती.
डहाणूचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी या प्रकरणाचा कसून तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. खटल्यादरम्यान विशेष सरकारी वकील अॅड. रेखा इवराळे यांनी न्यायालयासमोर पुरावे सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
























































