
<<< प्रसाद ताम्हनकर
[email protected]
आजवर संगणक म्हणजे सिलिकॉन चिप, ट्रान्झिस्टर आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अशीच आपली कल्पना होती. गेली अनेक दशके या तंत्रज्ञानाने संगणक अधिक वेगवान, लहान आणि शक्तिशाली बनवले. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण आणि महासंगणकांसाठी लागणारी प्रचंड ऊर्जा हे आता मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ संगणकासाठी पूर्णपणे वेगळा पर्याय शोधत आहेत. हा पर्याय म्हणजे मानवी मेंदूच्या पेशींवर आधारित जिवंत संगणक किंवा बायोलॉजिकल कॉम्प्युटिंग.
या संशोधनाचा केंद्रबिंदू आहे ब्रेन ऑर्गनॉइड. स्टेम सेल्सपासून प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हे सूक्ष्म त्रिमितीय पेशीसमूह मानवी मेंदूच्या काही रचना आणि कार्याची नक्कल करतात. हे पूर्ण विकसित मेंदू नसले तरी त्यातील न्यूरॉन्स एकमेकांशी विद्युत संकेतांची देवाणघेवाण करू शकतात. त्यामुळे माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी त्यांचा वापर करता येईल का, याचा शोध सुरू आहे. या नव्या संशोधन क्षेत्राला ऑर्गनॉइड इंटेलिजन्स असे नाव देण्यात आले आहे.
पारंपरिक संगणक गणिती प्रक्रिया अतिशय वेगाने करतात. मात्र मानवी मेंदू कमी ऊर्जेत शिकतो, अनुभव लक्षात ठेवतो, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि गुंतागुंतीचे निर्णय घेतो. संशोधकांचा प्रयत्न हा मेंदूच्या या नैसर्गिक क्षमतेचा उपयोग संगणकीय प्रणालींमध्ये करण्याचा आहे. भविष्यात अशा जैविक संगणकांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक ऊर्जा-कार्यक्षम, वेगवान आणि स्वयंपूर्ण बनू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अलीकडील काही प्रयोगांमध्ये प्रयोगशाळेत वाढवलेल्या मेंदूच्या पेशींना विद्युत संकेत देऊन विशिष्ट कामांसाठी प्रशिक्षित करण्यात आले. काही प्रणालींनी अनुभवातून स्वतची कार्यक्षमता सुधारल्याचेही संशोधकांनी नोंदवले आहे. यामुळे जैविक पेशी केवळ माहिती साठवून ठेवणार नाहीत, तर शिकण्याची आणि प्रतिसाद बदलण्याची क्षमता दाखवू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. हे संशोधन अजून प्राथमिक टप्प्यात असले तरी त्याकडे जगभरातील वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.
या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा वैद्यकीय क्षेत्राला होऊ शकतो. अल्झायमर, पार्किन्सन, अपस्मार आणि इतर मेंदूविकारांवरील औषधांची चाचणी मानवी मेंदूच्या पेशींवर अधिक वास्तववादी पद्धतीने करता येईल. त्यामुळे नवीन औषधे विकसित करण्याचा वेग वाढू शकतो. त्याचबरोबर वैयक्तिक उपचारपद्धती, मेंदूविज्ञान, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांनाही याचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. भविष्यात कमी वीज वापरणारे आणि स्वतः शिकणारे संगणक तयार करण्यासाठीही हे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते.
मात्र या क्षेत्रासमोर अनेक नैतिक प्रश्नही उभे आहेत. प्रयोगशाळेत वाढवलेल्या मेंदूच्या पेशी अधिक जटिल झाल्यास त्यांना जाणीव किंवा संवेदनांचे प्राथमिक स्वरूप प्राप्त होऊ शकते का, यावर वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. अशा संशोधनासाठी कोणती मर्यादा असावी, पेशींचा वापर कोणत्या उद्देशासाठी करावा आणि त्यावर देखरेख कशी ठेवावी, यासाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची गरज व्यक्त केली जात आहे.
याशिवाय या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संशोधन संस्थांनी जैविक पेशी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा संगम घडवून आणण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू केले आहेत. भविष्यात हवामान अंदाज, औषधनिर्मिती, स्वयंचलित वाहने, अवकाश संशोधन आणि गुंतागुंतीच्या वैज्ञानिक गणनांसाठी अशा जिवंत संगणकांचा वापर होऊ शकतो. मात्र त्यासाठी तांत्रिक प्रगतीबरोबरच सुरक्षितता, नैतिकता आणि कायदेशीर चौकट विकसित करणे तितकेच आवश्यक ठरणार आहे.
सध्या जिवंत संगणक आपल्या दैनंदिन जीवनापासून अजून दूर आहेत. आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये अशा जैविक चिप्स दिसण्यासाठी कदाचित अनेक वर्षे लागतील. तरीही जगातील अनेक संशोधन संस्था या दिशेने सातत्याने काम करत आहेत. सिलिकॉन आणि जैविक पेशी यांचा संगम घडवून आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले, तर संगणकशास्त्राच्या इतिहासात ही पुढची मोठी क्रांती ठरू शकते. विज्ञानकथांमध्ये दिसणाऱ्या कल्पना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत आकार घेत आहेत आणि भविष्यातील संगणक मानवी मेंदूकडूनच प्रेरणा घेतील, अशी चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. जगभरातील संशोधक या क्रांतिकारी तंत्रज्ञानाकडे आशेने आणि उत्सुकतेने पाहत आहेत.



























































