महिला आरक्षण तीन वर्षांनंतरही लागू का नाही? राहुल गांधी यांचा रिजिजू यांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला आरक्षण विधेयक हे 2023मध्येच संसदेत एकमताने मंजूर झाले होते. या विधेयकाला काँग्रेसने पूर्ण पाठिंबा दिला होता. आता हे विधेयक मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे, तरीही महिला आरक्षण अद्याप का लागू करण्यात आले नाही, असा खडा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना विचारला आहे.

केंद्रातील मोदी सरकारकडून महिला आरक्षण कायदा लागू करण्यास विलंब का केला जात आहे आणि तो परिसीमनशी का जोडला जात आहे, असे राहुल गांधी यांनी विचारले. सरकारने 2023मध्ये मंजूर झालेला कायदा कोणत्याही अटीशिवाय लागू करावा, अशी मागणीही राहुल यांनी या वेळी केली. राहुल यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करून म्हटले होते की, देशातील महिलांना स्वतःला व्यक्त करण्याची, कल्पना करण्याची परवानगी नाही. कोणताही देश तोपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत तेथील महिला स्वतःला व्यक्त करत नाहीत. रिजिजू यांनी त्यांच्या विधानावर उत्तर देताना लिहिले होते की, हा काँग्रेसकडून एक सकारात्मक संदेश वाटतो. राहुल यांच्या मनात महिलांबद्दल बदल झाला आहे. आशा आहे की, काँग्रेस कोणत्याही अटीशिवाय महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देईल!