
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप करतानाच, आगामी आंदोलनात आपण सरकारचा माज उतरवणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, आपल्याला अटक करण्याचा सरकारचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाच्या मागील बाजूस साकारण्यात आलेल्या शिल्पचित्राचे उद्घाटन जरांगे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपण टीका केलेली नाही. कुणबी प्रमाणपत्र रद्द का करताय हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वीच्या ओरिजनल नोंदी असताना त्या रद्द कशा होतात? सरकारला 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. मराठय़ांनी वेळीच जागे झाले पाहिजे. मराठय़ांनो, आपल्या मुलाबाळांचे कल्याण करण्यासाठी एकत्र या, असे आवाहन जरांगे यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस हे महसूलमंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून माझ्या मुळावर का उठलेत हेच समजायला मार्ग नसल्याचेही जरांगे म्हणाले. ‘ओबीसींचे प्रमाणपत्र रद्द करा, असे मराठय़ांनी कधीच म्हटलेले नाही. मात्र, मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांचे सरकार नुकसान करत आहे, हे मात्र आता लपून राहिलेले नाही. मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून फूट पाडण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बहुमताने सत्तेत आलेलो आहोत, आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असा सरकारचा समज झाला आहे. मराठय़ांनी त्यांना निवडून दिले आहे, याची जाणीव त्यांना नाही. धनगर समाज, मराठा समाज, दलित समाज, तसेच शेतकऱयांना या सरकारने फसवले. सत्तेचा माज चांगला नाही. 29 ऑगस्टला कोण कोणाचा माज उतरतोय, हे आपण दाखवून देणार असल्याचा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मला अटक करण्याचा सरकारचा डाव
सरकारने आरक्षणासंदर्भात एक नवा डाव आखला आहे. तो अत्यंत भयानक असल्याचेही ते म्हणाले. शिंदे आणि भाजपकडून आपल्याला वारंवार पह्न येत आहेत; परंतु आपण कोणाचेही पह्न घेतलेले नाहीत. रॅलीवर हल्ला करायचा आणि आपल्याला अटक करण्याचा सरकारचा डाव सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.



























































