
प्रयागराजमध्ये आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत देशातील बेरोजगारी आणि तरुणांच्या समस्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज संध्याकाळी मी तुमच्याशी वेदना, डेटा आणि संपत्ती या विषयांवर बोलायला आलो आहे.”
राहुल गांधी यांनी देशातील तरुण शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “हिंदुस्थानकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती आहे. हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. जगात अमेरिकेची चर्चा होते, रशिया आणि चीनची चर्चा होते. पण, हिंदुस्थानच्या युवा शक्तीपुढे हे सगळे देश काहीच नाहीत.” तसेच, “एक काळ असा होता जेव्हा अलाहाबाद विद्यापीठ हे देशातील सर्वोत्तम विद्यापीठ मानले जायचे,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.
रोजगाराच्या मुद्द्यावर व्यक्त केली चिंता
देशातील बेरोजगारीच्या भीषण परिस्थितीवर बोट ठेवत राहुल गांधी म्हणाले, “सध्या देशातील परिस्थिती अशी आहे की, एक हजार तरुणांपैकी केवळ १२ जणांनाच कायमस्वरूपी नोकरी मिळत आहे.” या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी NEET पेपर फुटीचा वाद, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या समस्या यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.



























































