
>>संध्या शहापुरे<<
मौनं सर्वार्थ साधनम् ही उक्ती सर्वांचीच पाठ असते आणि सोयीप्रमाणे त्याचे अर्थही लावले जातात. पण कोणत्या श्लोकातली आहे ते पाहिले, तर त्यातील संदर्भांमुळे उक्तीचे योग्य आकलन होईल. `आत्मनो मुख दोषेण। बध्यन्ते शुकसारिकाः। बकास्तत्र न बध्यन्ते। मौनं सर्वार्थ साधनम्।।’ हा पंचतंत्रातला श्लोक आहे. `स्वतच्या बडबड करण्याच्या सवयीमुळे पोपटआणि मैना पिंजऱ्यात अडकतात. बगळा मात्र मौन बाळगतो आणि स्वतंत्र राहतो. म्हणून निरर्थक बडबड करण्यापेक्षा मौन पाळणे गप्प राहणे कधीही चांगले. ईश्वराने दिलेल्या पंचेद्रियांतील वाणी हे देखील एक वरदान आहे. वाणीतील महत्त्वाचे साधन म्हणजे जीभ. जीभेला- रसनेला सर्वार्थाने ताब्यात ठेवण्याचे काम करणे म्हणजेच निरामय जीवन जगणे नाही का?
समर्थ रामदास `मौन मुद्रा धरावी’- म्हणतात, त्याचा अर्थ वाणीवर, बोलण्यावर संयम ठेवावा. प्रसंगी मौन पाळावे. म्हणतात ना, सुटलेला बाण, बोललेला शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणूनच समर्थांचा बोध सदैव ध्यानात ठेवावा. `मुखामध्ये राम कथा असावी. सुखासाठी अरण्य जवळ करावे. जिथे `राम’-सौख्य नाही, शांती नाही ते ठिकाण योग्यच नाही. म्हणजे प्रसंगी एकांतात राहावे. मौन पाळावे. रामाचे ध्यान करावे.’


























































