
राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षीच्या १ जानेवारीपासून ते यंदाच्या ३० जूनपर्यंत दीड वर्षाच्या कालावधीत पोक्सोचे २४९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यात बलात्कार, विनयभंग, छेडछाड, अत्याचार करून हत्या आदींचा समावेश असून दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवल्या जात असतानाच रायगडातील ‘लाडक्या बहिणीं’वर होणाऱ्या अत्याचाराकडे सरकार लक्ष देणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
आरोपींचा डाटा तयार
पोलीस दलातील अंमलदार यांना महिलांशी कसे वागायचे याबाबत एम पॉवर फाऊंडेशनद्वारे ट्रेनिंग देण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्यात लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपींचा डाटा पोलिसांकडे असून याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीकडे त्याची माहिती देण्यात आलेली आहे. अशा व्यक्तींना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सामाजिक भान असलेला जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे. याच भागात अनेक पर्यटनस्थळे असल्याने मोठ्या प्रमाणावर राज्याच्या विविध भागांतून पर्यटकांचा सतत ओघ सुरू असतो. दिवसेंदिवस पर्यटन वाढत असतानाच जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणदेखील वाढत आहे. पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षात २४९ पोक्सोचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २१९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
जिल्ह्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण यांसारखे गुन्हे सातत्याने घडत आहेत. त्याशिवाय बाजारात गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराची तक्रार दाखल होताच तातडीने गुन्ह्याचा तपास सुरू करून आरोपीला अटक केली जात आहे. तसेच आरोपीवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची कारवाई आम्ही करतो.
























































