
मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास आसनगाव स्थानकाजवळ बिघाड झाला. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरी आणि लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. अर्ध्या तासाच्या दुरुस्तीनंतर मालगाडी बाजूला हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आणि त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी मालगाडी आसनगाव स्थानकाजवळ आली असता तिच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडून पडली. मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची माहिती समजताच रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक दुरुस्ती करणाऱ्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अडीच वाजता बिघाड दुरुस्त करण्यात रेल्वेच्या दुरुस्ती पथकाला यश आले.



























































