
नालासोपाऱ्यातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जा पहिल्या मजल्यावर कोसळल्याची घटना आज घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली आहे. अग्निशमन दल आणि आचोळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ५५ कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. यानिमित्ताने रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नालासोपारा पूर्वेतील संकेश्वरनगर परिसरात रोशन अपार्टमेंट इमारत आहे. दुपारी १२ च्या सुमारास या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा मोठा भाग पहिल्या मजल्यावर कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच पळापळ झाली. याची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल आणि आचोळे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि इमारतीमधील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून इमारत सील केली.




























































