
जम्मू-कश्मीरच्या रामबन जिह्यात शनिवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली. केला मोड बोगद्यात सशस्त्र सीमा दलाच्या ताफ्यातील तीन वाहने एकमेकांवर आदळली. या दुर्घटनेत सशस्त्र सीमा दलाचे तीन जवान जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सशस्त्र सीमा दलाचा ताफा श्रीनगरहून जम्मूकडे जात होता. दरम्यान, हा ताफा रामबनाचे केला मार्गावर बोगद्यात पोहोचला. यावेळी पुढे जात असलेल्या एका वाहनाला अचानक ब्रेक लावण्यात आला. त्यामुळे मागे असलेल्या दोन्ही वाहनांना ब्रेक न लावता आल्याने या गाडय़ा एकमेकांवर आदळल्या. ज्यावेळी दुर्घटना घडली, त्यावेळी पाऊस पडत होता. यामुळे ही वाहने रस्त्यावर कोसळली. याशिवाय, बोगद्यात पुरेसा प्रकाश नव्हता. यामुळेही ही दुर्घटना घडली. रस्त्यावर पाणी आणि कमी दृश्यमान यामुळे अचानक ब्रेक लावल्याने वाहनांवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले. गाडय़ा एकमेकांवर आदळल्याने एकच धावपळ उडाली. दुर्घटनेत जखमी झालेल्या जवानांना तत्काळ रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



























































