
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्रेंड डोलांड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तयारी केली आहे. यासाठी अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱया देशांविरोधात कारवाई करणाऱया विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली आहे. या विधेयकात रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱया देशांवर टॅरिफ लावण्याची तरतूद आहे. आता हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हज पाठवले जाईल.
या विधेयकाला लिंडसे ओ. ग्राहम सँक्शनिंग रशिया अँड इराण अॅक्ट ऑफ 2026 असे नाव देण्यात आले आहे. हे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये 86-11 अशा बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. रशियासोबतचा व्यापार युव्रेन युद्धाला खतपाणी घालत आहे, असा युक्तिवाद अमेरिकेकडून केला जात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास पाच देशांवर 100 टक्के टॅरिफ लावला जाईल. यामध्ये हिंदुस्थान, चीन, अझरबैजान, हंगरी आणि स्लोव्हाकिया या पाच देशांचा समावेश आहे. हे पाचही देश रशियाकडून सर्वाधिक तेल आणि गॅस आयात करतात.
हे विधेयक रशियावरील निर्बंधासोबतच इराण सँक्शन अॅक्ट ऑफ 1996 ची मुदत 2031 पर्यंत वाढवणार आहे. हा कायदा इराणच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची तरतूद करतो.



























































