
वाडा तालुक्यातील प्रदूषणकारी युनाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व सिदप्रिया इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या दोन टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना सील ठोकण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ही कारवाई केली असून या दोन्ही कंपन्यांची वीजदेखील कापण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे वाडा तालुक्यात असलेल्या टायर कंपन्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाडा तालुक्याच्या वडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत टायरचे रिसायकलिंग करणारे अनेक कारखाने आहेत. त्यामुळे परिसरात वायू व जलप्रदूषण होत असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वडवली, नारे, मुसारणे, चिंचघर या गावातील रहिवाशांच्या घरात धूर व धूळ जात असल्याने अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकदा तक्रारी केल्या. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला. त्याची दखल घेत प्रदूषणकारी युनाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व सिद्धप्रिया इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक एकवटले
वडवली येथील टायर कंपन्यांमध्ये जुने टायर जाळून त्यापासून ऑईल व तारा वेगळ्या काढल्या जातात. त्यानंतर त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शिवाय प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नैसर्गिक नाल्यात नेहमीच टाकत असल्याने नाल्यातील मासे अनेक वेळा मृत पावले आहेत. त्यातील पाणी प्यायल्यामुळे जनावरांचाही मृत्यू झाला. प्रदूषणकारी टायर कंपन्यांविरोधात स्थानिक नागरिक एकवटले असून स्थानिक पातळीवर त्यांचा लढा सुरू आहे. दोन कंपन्यांवरील कारवाईला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी डॉ. सीमा दलवी यांनी दुजोरा दिला आहे.
“वडवली भागात अनेक प्रदूषणकारी टायर कंपन्या आहेत. काही दिवसांपूर्वी पायरोलीसिस या कंपनीत दोन निष्पाप मुलांसह चार जणांचा दुर्घटनेमुळे मृत्यू झाला होता. तरीदेखील अनेक मुले या कंपनीच्या परिसरात खेळताना दिसतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी.”
— कल्पेश पाटील, ग्रामस्थ



























































