
<< राखी अरदकर
[email protected]
पावसाळा आला की, मनाला एक वेगळीच ओढ लागते. हिरवीगार धरती, डोंगर-दऱ्या, धुक्याची चादर आणि कोसळणारा पाऊस मनाला सतत साद घालत असतो. अशाच एका पावसाळी दिवशी आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात गेलो आणि त्या दिवसाने मनावर कायमचा ठसा उमटवला.
धो-धो पाऊस पडत होता. समोर एक प्रशस्त, उंच डोंगर उभा होता. त्याच्या कुशीतून अनेक लहान-मोठे झरे वाहत होते. पावसाचा जोर वाढला की, राखाडी ढग वाऱ्याबरोबर हळूहळू पुढे सरकत डोंगराला पूर्णपणे झाकून टाकत होते. काही क्षणांत डोंगर दिसेनासा व्हायचा. मग पुन्हा वाऱ्याची झुळूक आली की, ढग पुढे पुढे सरकायचे आणि अनेक हिरवागार छटांनी भरलेला डोंगर पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहायचा. हा लपंडाव कितीतरी वेळ सुरू होता आणि तो पाहताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
वाऱ्याने डोलणारी झाडे, पावसात न्हालेली पालवी, हिरवीगार झुडपे आणि डोंगरातून वाहणारे झरे… सगळीकडे एक सुंदर लय निर्माण झाली होती. पावसाचे थेंब, वाऱ्याचा स्पर्श आणि धुक्याची हलकी चादर मनाला अनंत आनंद देत होती. असे वाटत होते, इथेच थांबावे, या निसर्गाचा एक भाग व्हावे.
लोक प्रेक्षणीय स्थळांना का जातात, याचे उत्तर त्या दिवशी मिळाले. मन भरून जगण्यासाठी, निसर्गाचा आनंद कवेत घेण्यासाठी. काही क्षण असे असतात की, ते आयुष्यभर मनात जपून ठेवावेसे वाटतात.
दूरून दिसणाऱ्या त्या डोंगराकडे पाहताना नेहमी वाटायचे, एकदा तरी त्या माथ्यावर जावे. लहानपणापासून ढगांमध्ये चालण्याचे एक छोटेसे स्वप्न मनात होते. त्या दिवशी ते स्वप्न पूर्ण झाले. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर ढग अक्षरशः माझ्यातून वाहत होते. एवढे धुके होते की, पायथ्याचा भाग दिसतही नव्हता. फक्त पावसाच्या सरी, थंडगार वारा आणि ढगांचा स्पर्श… हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता.
दुर्गा भागवत यांनी निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी देताना म्हटले आहे की, `निसर्गाकडे फक्त पाहू नका, त्याच्याशी मैत्री करा.’ त्या दिवशी या वाक्याचा खरा अर्थ उमगला. निसर्ग मनाने अनुभवायचा असतो.
त्या वर्षा सहलीने मला एक गोष्ट शिकवली. निसर्गाच्या जितके जवळ जाऊ, तितके आपण स्वतःच्या जवळ पोहोचतो. पावसाचा प्रत्येक थेंब, ढगांचा प्रत्येक स्पर्श आणि डोंगरावरील प्रत्येक झरा मनाला नवी ऊर्जा देऊन जातो. आजही ते दृश्य आठवले की, मन पुन्हा त्या ढगांच्या कुशीत जाऊन बसते. अशा क्षणांमुळेच जीवन अधिक सुंदर, समृद्ध आणि आनंदी वाटते. कधी कधी वाटते, निसर्ग आपल्याला आपल्या सहवासातून जगण्याचा खरा अर्थ शिकवत असतो.
(लेखिका चित्रकर्ती कला समीक्षक आहेत)



























































